You are currently viewing वडे पापडाचे दिवस…

वडे पापडाचे दिवस…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

 *१२. माझे गाव कापडणे…*

       (वडे पापडाचे दिवस)…

 

मग ? काय मंडळी?

तोंडाला पाणी सुटले ना? वड्याची डाळ, कुरडईचा चीक, नागलीचे गरम गरम तिळाची

चटणी व तेल टाकून खायचे पीठ ! अहाहा..

त्या कुरडयीच्या चिकाचे खरडचे छाटे छाटे वडे

कुरडयांच्या मध्ये वाळत टाकलेले असायचे.

संध्याकाळी कुरडया हाडके पर्यंत एकही वडा

तिथे शिल्लक रहात नसे. वडील तर कुरडया

धाब्यावरून खाली येताच धोतरावरून २/३ कुरडया उचलूनच घेत असत.कुरडया कुणाच्याही असोत गल्लीत, वडील आल्यावर

ओल्या कुरडया खाणारंच! तसेच उडदाच्या पीठाच्या लाट्याही खाणार! आम्ही तर कुरडयीच्या चिकात मस्त दूध साखर घालून

ओरपत असू. काही लोक तिळाचे तिखट व तेल घालून खातात.तसेच ज्वारी ओलून दळून घेरून व चिकनीचे ही पापड करतात.

 

मी आता आता पर्यंत घरी सर्व सामान करत असे. आणि आता निदान नास्त्यात खाण्यासाठी तरी बनवतेच..! चिक बनवते,

नागलीचे थोडेच पण पापडा सारखेच पीठ

घेरून घरात सर्व खातात आवडीने.ह्या पौष्टिक

चवदार पदार्थांशिवाय जीवनात मजाच नाही

हो! तेल पाण्याचे गरमागरम मठाचे वडे जरा

भाकरीत कुस्करून खाऊन पहाच! जोडीला

उडदाचे पापड भाजून, अहा! भाकरीचा पोपडा

आधी बुडवून चुरून खायचा बरं..

 

आणि गव्हाचे वडे भिजवून कांदा घालून गरमा

गरम पोळी बरोबर भाकरी बाजरीची बरं, आणि

जोडीला पिवळी धम्मक वाडगाभरून कढी! वा रे, वा! क्या बात है! कढीचा भुरका किंवा वाडगाच तोंडाला लावायचा हो! कोणाच्या बापाची भिती आहे? माझी आई गवार शेंदोडे

वाळवून तळायची.. बाप रे, काय मज्जा हो, लज्जत जेवणाची! उन्हाळ्यात पातेलंभर, गुळ

घालून चिंचेचं पन्हं, नि कैऱ्या आल्या की त्या उकडून

पन्हं करायची. गोरगरीब चिचानी नि शेवया मिसळून खायचे.

शेवयात चिचानी +गूळ घालून केलेली ती, टाकायची व ओरपायच्या

शेवया! जोडीला लाल सुकलेल्या मिरचीचं

पाट्यावर लसूण वाटून केलेलं वल्लं तिखं..नि बाजरीची पोपड्याची तेल टाकून भाकर …!

लाळ गळतेय् हो.. जीभेला चरका लागला ना भो…

आमच्या वाड्यात तर १२ पाटं शेवया ओवायला एका रांगेत बसायची.. आणि आम्ही

पाटा खाली शेवया तोडून खाटेवर टाकायला सज्ज. ओट्यावर तिरप्या लावलेल्या खाटांच्या

वरती शेवया खुडून फेकायच्या. हवेने त्या लगेच वाळतात. शेवया झाल्या की खाटा अंगणात उन्हात उतरंवायच्या बरं! ही सगळी कामे बायकाच करणार! आम्ही शेवया तोडतां

तोडता मध्येच उठून मागच्या पातेल्यातून गव्हाच्या पिठाचा चेंडू एवढा गोळा पळवून चुलीतल्या निखाऱ्यात लपवून येत असू. त्या निखाऱ्यात तो मीठ असलेला गोळा असा काही

खरपूस भाजून निघायचा की बस्स! असे वाटायचे तिन चार तरी खाल्ले पाहिजेत. पण

दोन तरी खाऊन होत असत. वा रे वा.. ज्याने

खाल्ले त्यालाच लज्जत कळणार..

 

आणि मग शेवया आटोपताच व्हायचा महिलांचा सह भोजनाचा कार्यक्रम.घरोघरी

सक्काळी लवकर स्वयंपाक, भाजी भाकरी

करून ठेवलेल्या असायच्या.मग त्या शेवयांच्या

ओट्यावरच साईत्रा माय, सुंदर आक्का, ममता

न्हानमाय, आपापल्या भाकरीच्या टोपल्या व भाजीच्या कढया घेऊन येत.गोल पंगत बसे.

आम्ही पोरं टोरं आजूबाजुने बसून पापड तोंडी

लावत सगळ्या महिला पदार्थ वाटून घेत खात

असत.खाली खाटांवर वाळणाऱ्या शेवयांकडे

लक्ष देत रमतगमत जेवण होई.तेवढ्यात वढाय गाय आली की है है करून हाकलावी लागे.एवढे काम पण ना भांडण ना तंटा. पाण्याचा तांब्या तोंडाला लावत ढेकर देत नाही तोवर खाली उतरून शेवया झोऱ्यावर ओतायच्या नि घरात मोकळ्या ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी खडखडीत झाल्या की भरले रांजण नि माठ कि गेले उतरंडीत ठेवणीच्या खोलीत! की पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकासाठी

बायका सज्ज! केवढे कष्ट होते हो.. अबबबबबब! अहो, हे सगळे मणावारी गहू

बायका पहाटे उठून जात्यावर दळत असत हो!

शिवाय वस्त्रगाळ करायचे, कोंडा पाखडायचा.

पहाटे उठून पिठं भिजवायची. हो, मुरले पाहिजे

ना? नाहीतर शेवयाच होत नाही हो..?

 

केवढे सहकार्य .. केवढे काम..! केवढे सौहार्द

किती एकोपा.. खेळी मेळीने.. ना निंदा ना नालस्ती ना कुरकुर..कुठे हरवले हो लोक?

कोणी शोधून आणून देतील का? तेव्हा भांडणे

नव्हती असे नाही पण दुस्वास धुसफुस शत्रुत्व

नव्हते. चहाच्या पेल्यातील वादळा प्रमाणे लगेच निवत असत. एकमेकींना स्वयंपाक झाला की चवीचे पदार्थ पोहचवणे असे, उधार

उसनवारी असे. माझी शेजारची रंगू काकू तर

रोज, “देख सुंदर, आज कानी हाई भाजी करेल से. लयस जराशी. खाई देखं व माय “! म्हणून

किती ही नाही म्हटले तरी घेऊन यायचीच!

थोडा वेळ बसून गप्पा मारायची मगच जायची.

कसे छान गरिबीतही लोक सुखी होते. पोटभर

खायला मिळते आहे ना? बस्स! स्वीस बॅंक नव्हती ती तस्करी नव्हती की निर्लज्जपणा

नव्हता. खूप वाईट वाटते..

 

“कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन”

कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन..

बीते हुए दिन वे मेरे, प्यारे पले दिन..

कोई लौटा दे मेरे ….

“ कालाय तस्मै नम:..

 

धन्यवाद मंडळी, भेटू पुढच्या रविवारी..

 

जय हिंद : जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा