*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
अध्याय पाचवा
*(श्री गजानन विजय ग्रंथ)*
अनुपम गुरू भक्त
“जोडी” श्री नि भास्कराची
कथा पांचव्या अध्यायी
ऐका आगळ्या नात्याची ||
सोळा कलांनी तापला
सूर्यदेव वैशाखात
वायुगतीसम चाल
महाराज ते तृषार्त ||
कृषीवल भास्कराने
जल घागर आणली
शेतामध्ये करी काम
झुडुपात लपवली ||
पाणी मागितले “श्रींनी”
भास्कराने नाकारले
मिळणार न आयते
भास्कराने सांगितले ||
डोकावती महाराज
जवळच्या गर्दाडात
वर्षे द्वादश हा शुष्क
पाणी नाही या कोसात ||
भान समाजहिताचे
“श्रींनी” प्रार्थिले ईशास
तळमळ प्रार्थनेत
झरे फुटले कूपास ||
गोड शीत स्वच्छ जल
पहाताच भास्कराने
पाय धरिले हो “श्रींचे”
शुद्ध अंतःकरणाने ||
भास्कराने क्षणार्धात
त्याग केला संसाराचा
मळा लावण्या भक्तीचा
सन्नीतीच्या सुफळांचा ||
पहा संतसंगतीचा
सकारात्म परिणाम
निजहित साधण्यास
उपयोगी संतनाम ||
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर
नागपूर.