सिंधुदुर्ग :
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कमळ या निशाणीवरच या मतदारसंघात निवडणूक लढविली जावी, असा अट्टाहास होता.
कोकणातील विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी, या मतदारसंघात कमळ निशाणीवरच युतीचा उमेदवार रिंगणात उतरविण्याचे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे मनसुबे होते. धनुष्यबाण चिन्हावरच लोकसभा लढविण्यासाठी सुरुवातीपासूनच इच्छुक असलेले किरण उर्फ भैया सामंत यांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कमळ निशाणीवर रिंगणात उतरण्याचा आग्रह धरला होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने या मतदारसंघातील युतीचा उमेदवार कोण? याची उत्सुकता लागून राहिली होती.
दरम्यान, शनिवारी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे दिल्ली येथे रवाना झाल्याने, राणे हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. एकच वादा, जय हो दादा.. असे स्टेटसही चर्चेत आले. सायंकाळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते.