You are currently viewing श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिर उपसमितीने स्व.राजन आंगणे यांना वाहिली श्रद्धांजली

श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिर उपसमितीने स्व.राजन आंगणे यांना वाहिली श्रद्धांजली

*श्रद्धांजली सभेत सहकाऱ्यांचे कंठ आले दाटून*

 

सावंतवाडी सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर उभारणीत स्व.राजन वामनराव आंगणे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, श्रीदत्त मंदिर हे जिल्ह्यातील देखणे भव्य मंदिर व्हावे, तिथे योगसाधना हॉल, आयुर्वेद उपचार, भक्त निवास अशी अनेक स्वप्ने त्यांनी उराशी बाळगली होती आणि ती पूर्ण होण्यासाठी मुंबई मंत्रालय पातळीवर भेटीगाठी घेत भक्त निवास मंजुरी, निधी उपलब्धता आदीसाठी प्रयत्न केला होता. भक्तनिवास होऊन त्या माध्यमातून जनसेवा घडावी यासाठी त्यांनी वेळोवेळी मुंबई वाऱ्या करून सहकाऱ्यांच्या मदतीने मंजुरी देखील मिळविली होती.

श्री एकमुखी दत्त मंदिर उभारणीची उंच उंच स्वप्ने पाहत असतानाच अचानक दिनांक १८ मार्च २०२४ रोजी कुणालाही पुसटशी कल्पना नसतानाच हृदय विकाराच्या झटक्याने राजनभाईंची प्राणज्योत विझली आणि सहकाऱ्यांना जबर मानसिक धक्काच बसला. या मानसिक धक्क्यातून सावरत शुक्रवार दिनांक २२ मार्च सायंकाळी ५.०० वा. एकमुखी दत्त मंदिर सभागृहात उपसमिती सदस्यांकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसमिती तसेच बांधकाम समितीचे सदस्य, भक्तगण उपस्थित होते. यात प्रामुख्याने श्री.दयानंद गवस, श्री.रघुवीर मंत्री, श्री.सुधीर धुमे, श्री.दीपक पटेकर, श्री.विनायक पराडकर, श्री.सुधीर पराडकर आदिंनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. श्री.दयानंद गवस यांनी राजन आंगणे यांच्या सोबतचा मंदिर उभारणी कामातील संपूर्ण प्रवास सांगून राजन भाईंचे कामातील महत्त्व विशद केले. जितेंद्र पंडित यांनी भक्त निवासची मंजुरी घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू असताना राजन आंगणे यांचा मिळालेला भक्कम पाठिंबा, मुंबई येथील मंत्रालय पातळीवर भाईंची असलेली दांडगी ओळख यामुळे भक्त निवास मंजुरीचा झालेला सुकर प्रवास आदींवर भाष्य करत राजन भाईंचे मंदिर पूर्णत्वास गेलेले पहायला हवे होते असे सांगितले. सुधीर धुमे यांनी सुरुवातीला दत्त मंदिराचे पत्र्याचे छप्पर प्रस्तावित असताना राजन भाईंनी पत्र्याचे छप्पर न घालता संपूर्ण सभामंडपवर आरसीसी स्लॅब घालुया असे स्वप्न दाखविल्याचे व सर्वांनी मिळून पूर्णत्वास नेल्याचे आवर्जून सांगितले.. परंतु शेवटी श्रद्धांजली वाहताना त्यांना अश्रू अनावर झाले. सुधीर पराडकर यांनी रिक्षा युनियनच्या स्थापनेपासून, रुग्णवाहिका आणणे इत्यादी सर्व सामाजिक कामांमध्ये राजन भाईंनी कशी आर्थिक मदत करत सहकार्य केलं या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटला होता. ज्येष्ठ सदस्य रघुवीर तथा भाई मंत्री हे बोलण्यास उभे राहिले तेव्हा तर त्यांचे शब्दच हरवले, भावना अनावर झाल्या होत्या. त्यांनी राजन भाईंच्या कार्याला वंदन करून “बाळा तू पाहिलेले स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्णत्वास नेऊ” अशी ग्वाही दिली. विनायक पराडकर यांनी मालवण पासून सावंतवाडी पर्यंतच्या नोकरी काळातील मैत्रीच्या आठवणी जाग्या केल्या. दीपक पटेकर यांनी राजन भाईंसोबतच्या गेल्या २५ वर्षातील बांधकाम क्षेत्रात काम करतानाच्या, कारीवडे गावातील अनेकांना दिलेल्या सढळहस्ते मदतीच्या, घर उभारणीसाठी लोकांना केलेले सहकार्य आदी अनेक आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. श्रद्धांजली सभेत अनेकजण भावनाविवश झाल्याने त्यांचे शब्द देखील फुटले नाहीत, त्यांनी बोलायचे देखील टाळले. कित्येकांचे तर डोळे पाणावले होते.

राजन आंगणे यांनी मंदिर भव्यदिव्य करण्याचे स्वप्न दाखविले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखणे मंदिर बनविण्याचे, मंदिरात दर्शनासाठी, पूजेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना निवासस्थान असावे म्हणून भक्त निवास बांधण्याचे स्वप्न पाहिले. लॉकडाऊन कालावधीत कलकत्ता येथून विमानाने आरसीसी कामासाठी कामगार आणले, कळस उभारण्यासाठी नांदेड येथील कारागीर आणणे आदी अनेक प्रयत्न केले होते. आपल्या परोपकारी वृत्ती आणि हसतमुख स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या हृदयात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळेच आजच्या श्रद्धांजली सभेसाठी अनेकजण उपस्थित राहिले. यावेळी समिती सदस्य श्री.जगदीश मांजरेकर श्री.अशोक नाईक, श्री.विलास सावंत, श्री.विलेश गोवेकर, श्री.सुभाष नाईक, श्री.शिरोडकर, सौ.मेघा तुळसुलकर , मिरा सिंग, श्रीम.सावंत, डॉ.कांचन विर्नोडकर, श्रीम.भगत, श्री.बाळ बोर्डेकर, श्री.सुहास सातोस्कर आदी सदस्य, भक्तगण, राजन आंगणे प्रेमी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक दयानंद गवस यांनी केले तर आभार दीपक पटेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा