आम जिल्हाध्यक्षांसह आठ ते दहा जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा…
कणकवली
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह आठ ते दहा जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन तसेच जमावबंदी आदेश धुडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती कणकवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना नुकतीच अटक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आप चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह ८ ते १० जणांच्या जमावाने आज दुपारी एकच्या सुमाास कणकवली बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केला.जमावबंदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी विवेक ताम्हणकर यांच्यासह आदित्य बटवाले, मंगेश दळवी, मिलि मिश्रा (कुडाळ,) प्रमोद जाधव (तरंदळे), काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर (कणकवली ) शरद खरात (कुडाळ) आदींसह ८ ते १० जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे. जिल्ह्यात ४४ कलम लागू असून जमावबंदी चे पालन सर्वांनी करावे असे आवाहन कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.