दिल्लीत ४ जूननंतर पुन्हा पांढरी दाढी – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास..
कुडाळ
आता आमचाही दशावतार सुरू झाला आहे. आज या मेळाव्यासाठी लोककलांमधील सर्वच जण उपस्थित आहेत. खासदारकीची निवडणूक लागली म्हणून येथे आलो असेल तर ते चूक आहे. कोरोना काळात या क्षेत्राला पालकमंत्री असताना मी सहकार्य केले आहे.कोरोना काळात अनेक चांगली माणसे गेली. त्यावेळी मी शब्द दिला होता की, कलिंगण कुटुंबीयांनी दशावतार कला सातासमुद्रापार नेली. त्यांच्या नावे महोत्सव भरविण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. पण काही बदल झाला आणि ते राहिले. पण आता हा महोत्सव होईल, असे प्रतिपादन कुडाळ तालुक्याच्या वतीने शिवसेना भजन मंडळ, दशावतार मंडळ मेळाव्यात शुक्रवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा मुख्य संघटक रुपेश पावसकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, प्रवक्ते रत्नाकर जोशी, संजय भोगटे, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, किसन मांजरेकर, बुवा भालचंद्र केळुस्कर, बुवा गुंडू सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज हे माझ्या काळात झाले. काही काळ जिल्ह्याचा विकास खुंटला. पण आमच्या शिंदे – फडणवीस – अजित पवार सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्यात विकासकामे होत आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला सुद्धा विकसित झाली पाहिजे. फुगडी, वारकरी, भजन या लोककलांना राजाश्रय मिळाला पाहिजे. सिंधुदुर्गात ज्या-ज्या माणसाने पालकमंत्री पद भूषविले त्यांनी येथील विकास केला. त्यांच्या सोबत जा, असे आवाहन सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी केले.
सिंधुदुर्गात आज विनायक राऊत सांगतात की, महायुतीकडे उमेदवार नाही. खरे तर पुढील काही दिवसात याबाबत घोषणा होईल. पण विनायक राऊत यांना विचारा की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? हाच खरा मुद्दा आहे. यावेळी महायुती ४०० पार जाईल. याबाबत विरोधक घाणेरडे राजकारण करीत असून ४ जूननंतर पांढरी दाढी पुन्हा दिल्लीत बसेल, असा विश्वासही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
तर केवळ लग्नसोहळे करून किंवा दुःखद घटनेत सांत्वन करून मत मागता येत नाही. त्यासाठी कामे मंजूर करून घ्यावी लागतात. अन्य लोकांनी मंजूर करुन घेतलेली कामे स्वत:च्या नावावर खपवयाची हे काम करायचे, असा टोला उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला.