*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सदस्या कवयित्री सोनल गादेवार लिखित अप्रतिम गझल रचना*
*आद्यरूपी गौतमी*
भेटते सारे कुणाला जे हवे ते नेहमी
ठेवणे असते मनाला शांत अगदी संयमी
केवढी दिसतात नाट्यातील पात्रे बोलकी
पण खऱ्या जगण्यात असते प्रेमभावाची कमी
आत आहे गाज मोठी आर्त सागर बोलला
संथ त्याने राहण्याची द्यायची का मग हमी?
घट्ट कर तू मूळ वृक्षा हो जरा कणखर उभा
ध्वस्त करते सर्व काही धूर्त वारे मोसमी
घेत जाते श्वास माती तृप्त होते काहिली
रानभर पाऊस फिरतो गोड देते बातमी
पिंजऱ्याला तोडणे नाही तुला जमणार या
जन्मभर कवटाळणे खोट्या सुखाची बेगमी
गर्द काळोखास भेदत मार्ग दाखवते पुढे
आदिमाया आदिशक्ती आद्यरूपी गौतमी
✍🏻सौ.सोनल मनोज गादेवार ©️®️
यवतमाळ