You are currently viewing सिंधुदुर्गातील जलजीवन मिशनचे ठेकेदार आक्रमक…

सिंधुदुर्गातील जलजीवन मिशनचे ठेकेदार आक्रमक…

सिंधुदुर्गातील जलजीवन मिशनचे ठेकेदार आक्रमक…

उद्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार ; तोडगा न निघाल्यास जलजीवन मिशनची कामे बंद- बाबा आंगणे

मालवण

जलजीवन मिशनच्या ठेकेदारांची कोणतीही चूक नसताना सुरू केलेली दंडात्मक कारवाई, सदोष निविदा प्रक्रिया, चुकीची अंदाजपत्रके, मुदतवाढ यासह अन्य प्रश्नांवर संतप्त बनलेल्या जिल्ह्यातील ठेकेदारांनी बाबा आंगणे, बिपीन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयासमोर आंदोलन केले.

दरम्यान या चुकीच्या धोरणाचा फटका जलजीवन मिशनच्या कामांना बसणार असून सर्व कामे ठप्प पडणार आहेत. त्यामुळे उद्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे श्री. आंगणे, श्री. कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या जिल्ह्यातील ठेकेदारांना जे आश्वासन दिले होते. त्याउलट विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची कोणतीही चूक नसताना प्रत्येक दिवशी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ठेकेदारांवर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर पावसाळी कालावधी सहा महिन्यांचा वगळून मुदतवाढ देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

यावेळी श्री. आंगणे म्हणाले, जलजीवन मिशनच्या कामांची निविदा प्रक्रिया सदोष आहे. जमीन बक्षीस पत्र व संमती पत्र नाही सह हिस्सेदारांचा विरोध आहे, पाईपलाईन टाकण्यास स्थानिक जमीन मालकांचा विरोध आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग यांचा विरोध आहे, प्रत्यक्ष पाहणी न करता केलेली चुकीची अंदाजपत्रके, सदोष भूजलचे दाखले, विज जोडणीला होत असलेला विलंब, प्रकल्प व्यवस्थापक कंपनी व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यात समन्वय नाही, चालू देयके देण्यासाठी सरपंचांची पत्रे मागितली जात आहेत, मनमानी दंड आकारणीमुळे कंत्राटदारांचे जगणे मुश्किल बनले आहे त्यामुळेच आम्ही आज हे आंदोलन छेडले उद्या या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. यात योग्य तो तोडगा न निघाल्यास जिल्ह्यातील जलजीवन मिशनची सर्व कामे बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुनील घाडीगावकर, मनोज वायंगणकर यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा