विश्व साहित्य संमेलनात कारिवडे गावचे सुपुत्र कवी तथा प्रा डॉ नामदेव गवळी यांनी मालवणी बोलीत कविता केली सादर*
सावंतवाडी
गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळालेल्या नवी दिल्ली येथील विश्व साहित्य संमेलनात कारिवडे गावचे सुपुत्र कवी तथा प्रा डॉ नामदेव गवळी यांनी मालवणी बोलीत कविता वाचन करून पुन्हा एकदा मालवणी बोलीकडे जगाचे लक्ष वेधले. सहा दिवस आणि एकूण १९० सत्रात चाललेल्या या विश्व संमेलनात १७५ बोलीभाषेचे ११०० साहित्यिक सहभागी झाले होते. त्यामुळे गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह या विश्व साहित्य संमेलनात मालवणी बोलीभाषेला स्थान मिळून दिल्याबद्दल नामदेव गवळी यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ११ ते १६ मार्च दरम्यान झालेल्या या साहित्य महोत्सवासाठी देशभरातून ११०० पेक्षा जास्त भारतीय प्रादेशिक भाषामधील साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले होते. यात मालवणी बोलीतील काव्य वाचनासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील एकमेव डाॕ. नामदेव गवळी यांचा समावेश होता. त्यांनी या संमेलनात मालवणी बोलीभाषेतून बोलीसह भाषांतरीत कविता वाचन करुन गिनीज बुक आॕफ वर्ल्ड रेकाॕर्ड मध्ये मालवणी बोलीभाषेला स्थान मिळवून दिले आणि सर्वांचे लक्ष वेधले. साहित्य अकादमीच्या या विश्व साहित्य संमेलनात प्रसिद्ध गीतकार गुलजार भारत सरकार संस्कृती राज्यमंत्री अर्जुन मेघवाल साहित्य अकादमीचे सचिव के. निवासराव अध्यक्ष माधव कौशिक आदी विचारवंत नाटककार निर्माते दिग्दर्शक लेखक साहित्यिक समीक्षक उपस्थित होते. यावेळी साहित्य अकादमीचे भारतीय २४ भाषांमधील २४ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ग्रामीण साहित्य हे अस्सल भूमीचे व जन्मजात असे साहित्य असुन सर्व साहित्याचे ते मुख्य अंग आहे. जागतिकीकरणामुळे अनेक ग्रामीणत्व परंपरा नष्ट होत आहेत. या ग्रामीण साहित्याला ऊर्जितावस्था व प्रोत्साहन मिळण्यासाठी साहित्य अकादमीने या साहित्य महोत्सवासाठी आयोजन केले आहे. या राष्ट्रीय साहित्य पुरस्कार वितरणात प्रख्यात उर्दू लेखक गुलजार यांच्या व्याख्यानासह भारतीय बहुभाषिक साहित्यिक कार्यक्रम या सहा दिवसात आयोजित करण्यात आले आहे.
डॉ नामदेव गवळी हे वैभववाडी येथील महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेच्या आनंदबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गेली ३० वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मालवणी बोलीतील भातालय या काव्यसंग्रहाला १२ राज्य पुरस्कार व इतर सन्मान प्राप्त झाले असुन या काव्यसंग्रहातील कवितांचा मुंबई व शिवाजी विद्यापीठातील स्वायत्त महाविद्यालय विवेकानंद कॉलेज येथे पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
तसेच डॉ नामदेव गवळी यांच्या भातालय या काव्यसंग्रहावर प्रा प्रवीण बांदेकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, प्रा. भाऊ गोसावी, कवी अजय कांडर, प्रा. मोहन कुंभार, डॉ. रणधीर शिंदे आदींनी लेखन केले आहे. हा काव्यसंग्रह लोक वाड:मयगृहाने प्रकाशित केला आहे. डॉ नामदेव गवळी यानी मालवणी लेखनासह मालवणी मुलखातील लोक साहित्यावर डॉ बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी संशोधन केले आहे.
मालवणी बोली भाषेच्या या संवर्धनासह प्रसार व प्रचाराच्या या कार्याबद्दल डॉ नामदेव गवळी यांचे महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी तसेच कारिवडेवासियानी अभिनंदन केले आहे.