*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*अध्याय तिसरा*
*(श्री गजानन विजय ग्रंथ)*
जानराव देशमुख
असे मृत्यु शय्येवरी
शोकमग्न आप्तजन
मार्ग काढा कांहीतरी ||
घरी वसे बंकटाच्या
एक साक्षात्कारी संत
त्यांस सांकडे घालावे
कृपा करा कृपावंत ||
पदतीर्थ समर्थांचे
देता जीव तो वाचला
जानरावा मिळाली हो
संजीवनी जीवनाला ||
समर्थांसारखा संत
असतांना शेगांवास
मृत्यु न यावा कोणास
जनमनी हीच आंस ||
काही अशक्य नसते
ख-या संतपुरूषाला
परि मृत्यु न टाळती
निवारती संकटाला ||
मृत्यु तीन प्रकारचे
एक अध्यात्मिक असे
कुपथ्याने व्याधी देही
आधिभौतिकात दिसे ||
मृत्यु आधिदैविकाचा
परिहार नवसाने
आधिभौतिकाचा नाश
होतो योग्य औषधीने ||
अध्यात्मिक मृत्यु मात्र
कोणाच्याने न टळतो
श्रीकृष्णासन्मुख रणी
अभिमन्यु ही पडतो ||
विवेचन हे मृत्युचे
ज्ञानार्जन होई जना
निवारण्या गंडांतर
खरे साधुत्वच जाणा ||
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.