You are currently viewing कै.राजनभाई आंगणे…

कै.राजनभाई आंगणे…

*….एक सच्चा दिलदार मित्र, राजस व्यक्तिमत्त्व*

 

राजनभाई..

होय, अगदी मित्रमंडळी सुद्धा त्याला राजनभाई म्हणूनच हाक मारायची.. वयाने छोटा असो किंवा मोठा प्रत्येकाला जवळचा असा वाटणाऱ्या राजनभाईच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य आणि ओळखीच्या सर्वांनाच हात दाखवून आपल्या ओळखीची प्रचिती देण्याची पद्धत..! अगदीच जवळ भेटला तर मग हातात हात देत, त्याचीच नव्हे तर घरच्या सर्वांची अगदी आस्थेने चौकशी करण्याची पद्धत.. यामुळे मालवण, वायरी येथे लहानाचा मोठा झाला तरी राजनभाई सावंतवाडीत अनेकांचा हक्काचा माणूस म्हणून जगला.. भाई म्हणजे भावासारखा राहिला, कित्येकांना मदतीचा हात देत आधारवड बनला.. अनेकांचा तारणहार, मित्र, आधार १८ मार्च २०२४ रोजी अचानक कुणालाही कल्पना न देता या जगाचा निरोप घेऊन गेला..निपचित पडलेला परंतु प्रसन्न देह पाहून मनाला चटका लागावा असा हा धक्का..कित्येकांना सहन झाला नाही. मित्रमंडळी, नातेवाईक, राजनभाईंवर प्रेम करणाऱ्या अनेकांचे डोळे पाणावले, अन् अश्रुंच्या धारा बरसल्या. सर्वांना “तब्बेतीची काळजी घ्या, व्यायाम करा, तंदुरुस्त रहा” असे आवर्जून बजावणाऱ्या राजनभाईनी मात्र स्वतःची काळजी न घेताच गेला.

राजनभाई हा मित्रांचा सच्चा, दिलदार मित्र… आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने अनेक मित्र जोडले होते..याचा प्रत्यय आला तो “राजनभाई गेला” ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा सावंतवाडी रुग्णालयात जमलेल्या मालवण पासून संपूर्ण जिल्ह्यातील लोकांच्या गर्दीने..! त्याने कितीतरी मित्रांना आयुष्यात उभे राहण्यासाठी बळ दिले. आर्थिक, मानसिक आधार दिला. कारीवडे गावातील कितीतरी तरुणांना योग्य दिशा दाखवली, रोजगार दिला. गोरगरीब कोणीही त्याच्याकडे मदतीसाठी आला तर तो कधीच रिकामी हाताने परतला नाही. कारीवडे गावात अनेकांना घरे बांधण्यासाठी, लग्न कार्यासाठी सढळहस्ते आर्थिक मदत केली परंतु कधीही त्याचा गाजावाजा नाही की मोठेपणा नाही. गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे भागीदारीत त्याचा क्रशर व्यवसाय होता, परंतु सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे गावातील शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन खरेदी करून तिथेही त्याने स्वतःचा त्रिमूर्ती स्टोन नावाने क्रशर सुरू केला. प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या राजनभाईने केवळ व्यवसाय म्हणून धंद्याकडे पाहिले नाही तर गरजवंताला मोफत खडी, डबर अनेकदा दिले. मंदिर बांधणी कामी अनेक मंदिरांना मटेरियल दिले. त्यामुळे राजनभाई दानशूर व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली.

क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ. सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन मधून खेळणाऱ्या मुलांना उच्च पातळीवर खेळण्यासाठी अनेकदा आर्थिक मदत देखील त्याने केली आहे. आपली मुले पुढे जावीत, शहराचे, जिल्ह्याचे नाव रोशन करावे यासाठी राजनभाई प्रयत्नशील असायचा. तालुक्यात होणाऱ्या कित्येक क्रिकेट टुर्नामेंटला राजनभाई स्पॉन्सर करायचा. त्यामुळे अनेकजण टुर्नामेंट भरविताना राजनभाईला गाठायचे आणि भाई देखील त्यांना निराश करत नसायचा. गेली अनेक वर्षे भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून भाई काम पाहत होता. अनेक संस्थांवर सदस्य म्हणून कार्यरत होता. सावंतवाडीतील एकमुखी दत्त मंदिरच्या बांधकाम समितीवर उपाध्यक्ष म्हणून गेली चार वर्षे कार्यरत होताच परंतु मंदिर बांधकाम पूर्ण होण्यासाठी त्याने अविरत प्रयत्न केले. अलीकडेच श्री.दत्तमंदिरची उपसमिती निवड झाली त्यामध्ये देखील सदस्य म्हणून राजनभाईंची निवड झाली होती. श्री.एकमुखी दत्त मंदिर भक्त निवास करिता सरकारकडून जवळपास ४ कोटींचा निधी मंजूर झाला, तो निधी मंजूर करून मिळविण्यासाठी देखील राजनभाईने मोलाचे सहकार्य लाभले. भविष्यात सुंदर, रेखीव, देखणे मंदिर व सुसज्ज भक्तनिवास, योगा हॉल, आयुर्वेदिक सेंटर अशा अनेक योजना मंदिर परिसरात सुरू करण्याचा देखील त्याचा मानस होता.

कोणत्याही राजकीय पक्षाशी राजनभाई संलग्न नव्हता परंतु सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्याचे सलोख्याचे संबंध. अनेक राजकीय नेत्यांची कारकीर्द घडविण्यात भाईचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे प्रत्येक पक्षात भाईला मानसन्मान मिळत राहीला. मालवण येथील जन्म असला आणि आंगणेवाडी हे मूळ गाव असलं तरी भाईची कर्मभूमी मात्र सावंतवाडीच होती. सावंतवाडीने भाईला ओळख मानसन्मान सर्वकाही दिलं. राजकारणात नसला तरी राजकीय क्षेत्रात वचक होती, समाजकार्यात अग्रेसर असल्याने सामाजिक क्षेत्र त्याचं जवळचं..आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर असल्याने वैद्यकीय क्षेत्राशी निगडित, मंदिर कमिटीवर कार्य करत आध्यात्मिक जीवनाशी संबंधित, अनेकांना शैक्षणिक मदत देत शिक्षण क्षेत्रात कार्यरत, तर स्वतःचा उद्योग व्यवसाय बांधकामाशी निगडित असल्याने त्याने स्वतः देखील बांधकाम व्यवसाय केलाच परंतु अनेकांचा व्यवसाय उभा राहण्यासाठी मदतीचा हात दिला, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातही नावलौकिक मिळविला होता. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना सढळ हस्ते मदत देत सांस्कृतिक क्षेत्रात देखील पुढे. अशा नानाविध क्षेत्रातील अतुलनीय व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून दुरावले आहे.

राजन म्हणजे राजा..! नावाप्रमाणे राजासारखा “राजस” जगणारा राजनभाई आज आपल्यात नाही हे आजही खरं वाटत नाही. असंख्य मनावर आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने राज केलं, कित्येकांना आपलंसं बनवलं. आपल्याकडे जे आहे ते देण्याची वृत्ती त्याच्याकडे होती, अशी वृत्ती फार कमी लोकांकडे असते परंतु ती भाईकडे ठासून भरलेली होती. स्वतः कितीही अडचणीत असला तर भाईचा हात दुसऱ्याला देण्यात पुढेच असायचा. त्यामुळे समाजातील विविध घटकांचा आज आधार गेला असे उद्गार अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत होते. अशा या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे हे जाण्याचे वय नव्हते..

परंतु, नियतीपुढे कोणाचेही न चाले..

अनेक प्रियजनांना दुःखाच्या महासागरात लोटून राजनभाईने प्रसन्न वदने जगाचा निरोप घेतला अन् वैकुंठवासी झाला..परंतु शरीराने जरी राजन भाई दूर गेला तरी एक मित्र म्हणून मित्रांच्या हृदयी..आधार म्हणून निराधारांच्या ठायी..हसतमुख दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून किर्तिरुपे अनेकांच्या नजरेत कायमच अमर राहील…!

शेवटी एकच म्हणेन..

*दूर जरी झालास तरी..*

*किर्तिरुपे उरशील तू उरी..*

 

राजनभाई, ईश्वर तुझ्या आत्म्यास चिरशांती देवो…हीच मनोकामना..!🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा