You are currently viewing गतविजेत्या भारताने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मारली धडक

गतविजेत्या भारताने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मारली धडक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. भारताने उपांत्य फेरीचा सामना दोन गडी राखून जिंकला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित आहे. भारताने सलग सहावा सामना जिंकला आहे. भारताने नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.

भारताने उपांत्य फेरीत रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दोन विकेट्स राखून पराभव केला. भारत पाच वेळा चॅम्पियन बनला असून तीनदा अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला आहे. अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. तिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो.

या सामन्यात भारताकडून कर्णधार उदय सहारनने शानदार खेळी केली. ३२ धावांवर चार विकेट पडल्यानंतर त्याने सचिन दाससोबत १७१ धावांची भागीदारी केली. सचिन दुर्दैवी होता आणि त्याला शतक करता आले नाही. तो ९६ धावा करून बाद झाला. ४९व्या षटकात सहारन बाद झाला. तंबूमध्ये परतण्यापूर्वी त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवले होते. २४४ धावांवर तो बाद झाला. भारताला विजयासाठी फक्त एक धाव करायची होती. राज लिंबानीने चौकार मारून सामना संपवला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावून २४४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ४६ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर लाहुआन ड्रे प्रिटोरियसने रिचर्ड सेलेटस्वेनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. प्रिटोरियसने १०२ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर व्हाईटहेडने २२ धावा, डेव्हन मरायसने तीन आणि कर्णधार युआन जेम्सने २४ धावा केल्या.

रिचर्डने एक बाजू लावून धरली आणि अर्धशतक झळकावले. तो १०० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६४ धावा करून बाद झाला. रिले नॉर्टन सात धावा करून नाबाद राहिला आणि ट्रिस्टन लुस १२ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २३ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मुशीर खानने दोन विकेट घेतल्या. नमन तिवारी आणि सौमी पांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताची सुरुवात खूपच खराब झाली. ३२ धावांत त्यांचे चार विकेट पडल्या. आदर्श सिंग पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर मुशीर खान चार धावा करून तंबूमध्ये परतला. अर्शीन कुलकर्णी १२ धावा करून बाद झाला तर प्रियांशू मोलिया पाच धावा करून बाद झाला. चार विकेट पडल्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी डावाची धुरा सांभाळत संघाला सामन्यात परत आणले. सचिनने ९५ चेंडूत ९६ धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि एक षटकार मारला. उदयने १२४ चेंडूत ८१ धावा केल्या. त्याने सहा चौकार मारले. राज लिंबानीने शेवटच्या षटकांमध्ये चार चेंडूत १३ धावा देत सामना लवकर संपवला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. उदय सहारनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा