*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.अध्यक्ष लेखक कवी श्री. पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*व्यक्तित्व विकास म्हणजे नक्की काय असतं?*
अदृश्य, गूढ, अचिंतनीय अश्या तत्वाचे दृश्य, चिंतनीय, समजण्यासारखे रूप म्हणजे व्यक्त तत्व. व्यक्त होतो तोच व्यक्ती. प्रभावीपणे व्यक्त होवून इच्छित परिणाम होतो तेंव्हा ते व्यक्तित्व. हे व्यक्तित्व जेंव्हा विश्वाच्या कल्याणासाठी वापरले जाते तेंव्हा ते विकसित व्यक्तित्व किंवा व्यक्तित्व विकास.
केवळ व्यावहारिक, योग्यप्रकारे, काटेकोरपणे नियमांचे पालन करणे म्हणजे व्यक्तित्व विकास असू शकत नाही. केवळ बाहेरून चांगले दिसणे, असणे, वागणे, किंवा चांगली अस्खलित भाषा बोलणे, एटीकेट्स, न्यानर्स पाळणे, यामुळेही व्यक्तित्व विकास होत नाही. शरीराच्या जडण घडणी बरोबरच मनाला स्थिरता, बुध्दीला विवेक देणारे विचार व्यक्तिमत्व खुलवतात. मन ही एक अजब वस्तू आहे. ते दिसत नसले तरी विश्वव्यापक आहे. साऱ्या अलौकिक शक्ती माणसाच्या मनातच असतात. सूक्ष्मा कडून स्थुलाकडे प्रवास सतत चालू असतो. या मूळ मनाच्या ठिकाणी वसणाऱ्या या सूक्ष्म शक्तीचे तिथेच मनाच्या ठिकाणी जर आपण नियंत्रण करू शकलो तर पुढील कितीतरी प्रकारची अपयशे आपण टाळू शकतो. आणि या मनोविकासाची संपूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वच संतांनी , विचारवंतांनी अत्यंत उघडपणे व स्पष्ट रीतीने आपल्या वाड:मयातून मांडली आहे. त्यासाठी ते वाचन, मनन,चिंतन करीत राहणे हा पहिला टप्पा आणि ते आपल्या वर्तनात उतरविणे हा दुसरा टप्पा. पूर्वार्ध पेक्षा उत्तरार्ध महत्वाचा आहे. पण पूर्वार्ध पार केल्यावरच उत्तरार्ध मिळणार आहे. पूर्वार्ध हे साधन किंवा साधना आहे तर उत्तरार्ध हे साध्य आहे. याची पूर्ण जाणीव असली की नेणीवेकडे जाण्याचा म्हणजेच आत्मशोध घेण्याचा मार्ग सुकर होतो. आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे. सक्रेतीस नेही know thyself ase सांगितले आहे. व्यक्तित्व विकास साधण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. मी कोण आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. नंतर भगवंत कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे आणि नंतर माझा आणि परमेश्वराचा संबंध कसा दृढ होईल यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. यालाच योग म्हणतात. युज म्हणजे जोडणे माणसाचे परमेश्वराशी जोडणे म्हणजे योग.
स्वतः ला जाणून घेवून आपल्यातले दोष कमी करणे आणि आपल्यातल्या गुणांचे वर्धन व जोपासना करणे म्हणजे व्यक्तित्व विकास होय.त्यासाठी आपल्या अंतर्मनाशी सहज संवाद साधता आला पाहिजे. त्यातूनच चिंतन घडून आपल्या व्यक्तित्व विकासाच्या प्रगतीचा मार्ग प्रकाशमान होतो. याचे काही टप्पे आपणास खालीलप्रमाणे तपासता येतील.
१. आपल्या व्यक्तिमत्वात बदल होत आहे हे आपणास जाणवू लागते.
२. आपण आपणास ओळखू लागतो.
३. आपल्यातील गुण व दोष हेरू शकतो.
४. दोष कमी करणे आणि गुणाची वृध्दी व संगोपन करावेसे वाटते.
५. आपण इतराशी सहज संवाद करू शकतो, तो प्रभावी असतो आणि तो इतरांना हवाहवासा वाटतो हे आपल्या लक्षात येते.
६. हळू हळू आपण लोकांना प्रेरणा देवू शकतो किंव्हा आपल्यापासून लोक प्रेरणा घेत आहेत हे आपल्या लक्ष्यात यायला लागते.
७. इतरांनी यश मिळविले, पराक्रम गाजवला तर आपणाला मनापासून त्याचे कौतुक करावेसे वाटते आणि तसे आपण करतो.
८. आपण दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेवू शकतो.
९. आपल्या वाणीमध्ये मार्दवता येत असल्याचे आपणास जाणवते.
१०. बदलत्या परिस्थितीशी, वातावरणाशी आपण सकारात्मक पद्धतीने सहज गत्या आपण जुळवून घेवू शकतो.
११. अंतर्मुख होवून विचार करू शकतो, आपणच आपले परीक्षक,निरीक्षक, समीक्षक बनू शकतो आहोत याची जाणीव व्हायला लागते.
१३. शडरीपुवर आपण हळू हळू विजय मिळविण्यात यशस्वी होत असल्याची चाहूल लागते.
तर आपण करू यात का असा प्रयत्न, स्वांत सुखाय!
*पांडुरंग कुलकर्णी नाशिक*