You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींना स्वतःचे नूतन ग्रा.पं. कार्यालय बांधण्यास मंजुरी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींना स्वतःचे नूतन ग्रा.पं. कार्यालय बांधण्यास मंजुरी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींना स्वतःचे नूतन ग्रा.पं. कार्यालय बांधण्यास मंजुरी…

१ कोटी ३० लाख रुपये निधीची तरतूद : जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांची माहिती

वेंगुर्ले :

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास १ कोटी ३० लाख रुपये निधीची तरतूद करून दि.१ डिसेंबर, २०२३ मधील तसेच पुढील अटींच्या अधीन राहून शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील खानोली ग्रामपंचायत २० लाख, तुळस ग्रामपंचायत २५ लाख आणि अणसुर ग्रामपंचायत साठी २० लाख निधी तसेच कणकवली तालुक्यातील भरणी ग्रामपंचायत साठी २० लाख, देवगड तालुक्यातील फणसे ग्रामपंचायत साठी २० लाख आणि दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ कट्टा ग्रामपंचायत साठी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

ग्रामपंचायत च्या या इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणून, नैसर्गिक प्रकाश योजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनःर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.आणि हे काम जास्तीत जास्त एक वर्षात पूर्ण होईल, असे नियोजन करण्याची सूचना शासनाने ठेवली आहे. त्यामुळे लवकरच या ६ ही ग्रामपंचायतच्या नूतन इमारती पूर्ण होणार असून त्या नव्या कार्यालयातून गावाचा कारभार चालणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील तीन ही ग्रामपंचायतींना मंजुरी मिळण्यासाठी सचिन वालावलकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोचरा सरपंच योगेश तेली यांनी विशेष प्रयत्न केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा