धरणे आंदोलन मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणुक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने धरणे आंदोलन, मार्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध आदेश जारी केले आहे.
निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातारवरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/ उपविभागीय दंडाधिकारी/ तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालय, संस्था,शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मार्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि.6 जून 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत.