You are currently viewing आड बंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे…

आड बंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे…

आड बंदर येथे सापडली दोन विशेष कातळचित्रे…

देवगड

आतापर्यंत देवगड तालुक्यात शंभरहुन अधिक कातळचित्रे सापडली आहेत. पण देवगडच्या किनारपट्टी भागात व त्याहून देवगडच्या दक्षिणेकडील भागात आतापर्यंत कातळचित्रे सापडली नव्हती. कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ हे सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोध मोहीम राबवत आहे. काल दिनांक १५ मार्च रोजी मुणगे या गावातील आडबंदर येथील सड्यावर दोन मानवाकृती सापडल्या आहेत. प्राच्यविद्या अभ्यासक  रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला त्यावेळी येथे पुसटश्या मानवाकृती रेषा दिसत होत्या. या दोन आकृत्यांमध्ये दगड मातीचा मोठा ढीग पडलेला होता. त्यामुळे ह्या चित्रांचे नेमके आकलन काही होत नव्हते. इथली दगड माती उचलून बारकाईने सर्वच साफसफाई केल्यानंतर या कातळचित्रांची आकृती स्पष्टपणे दिसू लागली.
या कातळ चित्रां विषयी अधिक माहिती सांगताना . रणजित हिर्लेकर म्हणाले या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्य रेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
या कातळचित्रा विषयी एक विलक्षण कथा या भागात ऐकायला मिळाली. गावातील लोक या आकृत्यांना मामा भाचे असे म्हणतात. हे दोघेच कातळावर शिकारीसाठी फिरत असताना त्यांना शिकार न मिळाल्यामुळे येथे थकून बसले होते. इतक्यात एक कुठला तरी जंगली प्राणी या दोघांच्या मधून पळून जाताना त्यांना दिसला. दोघांनी तात्काळ त्या प्राण्याच्या दिशेने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण तो प्राणी शिफाईने पळून गेला व बंदुकीच्या गोळ्या लागून दोन्ही मामा भाचे ठार झाले. या मानवाकृतीच्या डोक्याच्या जागी जे दोन खळगे दिसतात त्या त्यांना लागलेला गोळ्या आहेत असे येथील गाववाले समजतात.
या परिसरात आणखीनही काही कातळचित्र मिळण्याची शक्यता आहे असे सांगून श्री अजित टाककर पुढे म्हणाले की आपल्या भागातील कातळचित्रांविषयी लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. ही कातळ चित्रे पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाची असून भविष्यात आपल्या भागातील पर्यटन रोजगार यामुळे वाढणार आहे व त्याचा फार मोठा आर्थिक लाभ स्थानिक जमीनदारांना होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा