काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो १० रुपये अनुदान हा ऐतिहासीक निर्णय…
प्रमोद जठार यांनी मानले आभार; हे यश म्हणजे शेतकऱ्यांचा विजय..
कणकवली
काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने प्रतिकिलो १० रुपये प्रमाणे २ टनापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. यासाठी ३०० कोटींची तरतूदही करण्यात आलेली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किला १० रुपये प्रमाणे दोन टनापर्यंत अनुदान देण्याचा झालेला निर्णय हा ऐतिहासीक निर्णय आहे. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागणीला मिळालेले हे यश म्हणजे शेतकऱ्यांचा विजय आहे. अशी माहिती माजी आम. प्रमोद जठार यांनी दिली.
कणकवली येथील विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख माजी आम. प्रमोद जठार बोलत होते .यावेळी राजू पवार, बबलू सावंत, शिशीर परूळेकर, संतोष पुजारे, सदा चव्हाण, बाळा पाटील व इतर उपस्थित होते.
प्रमोद जठार म्हणाले,शेतकऱ्यांना अनुदान देण्याची झालेली ही सुरूवात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर डायरेक्ट ही रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना हा लाभ मिळावा म्हणून आपण व आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. गेल्या सहा महिन्यांपासून आपला काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव अथवा अनुदान मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. यात एकतर हमीभाव, गोव्याप्रमाणे भावांतर योजना, किंवा अनुदान याबाबत मतमतांतरे होती. हमीभाव हा अत्यावश्यक पिकासाठी असल्याने व केंद्राकडून दर निश्चितीची गरज असल्याने गोव्याप्रमाणे भावांतरचा मुद्दा पुढे आला. मात्र, गोव्याप्रमाणे आपल्याकडे खरेदी यंत्रणा नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने प्रतिकिलो १० रुपये प्रमाणे २ टनापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. यासाठी ३०० कोटींची तरतूदही करण्यात आलेली असल्याचे प्रमोद जठार म्हणाले.