सिंधुदुर्गनगरी :
कोरोना प्रादुर्भाव काळात इ. पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाच्या कोणत्याही परिपत्रकात स्पष्ट निर्देश नसताना शासन परिपत्रकाचा चुकीचा संदर्भ देत प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गातील शिक्षणप्रेमींची दिशाभूल करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून वारंवार शिक्षकांचं मानसिक खच्चीकरण होत असून त्याविरोधात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी दि 24 डिसेंबर रोजी लक्षवेधी आंदोलन करण्याचानिर्णय घेतला आहे. हे आंदोलन अभूतपूर्व करण्याच्या निर्णयावर संघटना ठाम असून केवळ स्वतःचा अहंकार जपण्यासाठी राज्यातील इतर जिल्हयांपेक्षा आपण काहीतरी वेगळे करत असल्याचे भासवणा-या या शिक्षणाधिकारींचा 24 डिसेंबरला जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांसमोर भांडेफोड करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं देण्यात आला आहे.
शासन परिपत्रकांचा चुकीचा अर्थ काढणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वारंवार दाखला देत मनमानी कारभार करणे, जिल्हयातील प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींचे मानसिक खर्चीकरण करण्याचा जणू विडाच उचललेल्या सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीच्या कार्यपध्दतीविरोधात जिल्ह्यातील सामान्य शिक्षकांमध्ये निर्माण झालेला असंतोष व्यक्त करण्यासाठी जि. प. सिंधुदुर्गसमोर लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट संकेत सर्व प्राथमिक शिक्षक संघटनानी दिले आहेत.