You are currently viewing तळगाव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

तळगाव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

झाराप :

 

महाराष्ट्र शासन राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या ‘तळगांव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण’ करणे कार्यक्रमाचे भूमिपूजन केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते झाराप येथे संपन्न झाले. यावेळी उपस्थितांशी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात संवाद साधला.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील या महामार्गाच्या टप्प्याचे सुशोभीकरण मंजूर करून घेतले. दिल्लीनंतर आपल्या जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे महामार्गाचे सुशोभीकरण होणार आहे. हा निसर्ग संपन्न जिल्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हाच यामागचा मानस आहे. कारण महामार्ग म्हणजे केवळ प्रवासाचे नव्हे तर जनतेच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांनी केले.

 

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस दत्ता सामंत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता मुकेश साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष गुणाजी जाधव, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, जिल्हा सरचिटणीस संजना सावंत,संध्या तेरसे, दीपा लक्ष्मी पडते, झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, तेर्से बांबर्डे सरपंच रामचंद्र परब, हुमरस सरपंच सिताराम तेली, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, राजू राऊळ, मोहन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे व आपले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. मी राज्यात मुख्यमंत्री असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तर आता आम्ही दोघेही केंद्रात मंत्री आहोत. अशाच एका कॅबिनेट बैठकीनंतर बाहेर पडताना मी त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग पूर्ण झाला असून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे असे सुचवले. त्यांनी याबाबत प्रस्ताव देण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही त्वरित प्रस्ताव सादर केला व त्या प्रस्तावाला त्यांनीही लगेचच मान्यता दिली.दोन दिवसांपूर्वीच त्यांना भेटून या कामाला मंजुरीही घेतली. त्यामुळेच आता हे काम जलद गतीने पूर्ण होणार असून जिल्ह्याला एक नवे रूप प्राप्त होणार आहे यासाठी मी नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा