*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
(*जात्यावरच्या ओव्या* )
पहाटेच्या प्रहरात
शुक्र डोकावे आभाळी
साखर झोप उडवी
सासुबाईची आरोळी—-
राम प्रहरेच्या वेळी
बसुनिया जातेपाळी
दूर ऐकू येते कानी
रामरायाची भुपाळी—-
दाना पडता जात्यात
चालू लागे घरघर
मुखातुन निघू लागे
रामरायाचा गजर—-
पाटाच्या पाण्याची लाट
पक्षांचा कलकलाट
दारी प्राजक्त फुलला
सुगंधाचा घमघमाट—-
सासु बाईच्या संगती
ओवी म्हणते जनाई
थोर भाग्य उजळले
सासुरवाडीची पुण्याई—-
कपिलेच्या पुढ्यात
चारा मायेचा घालते
चरवी दुधाची भरी
घरी गोकुळ नांदते—
नंदा जावा सुवासिनी
घरात माझ्या साजिऱ्या
संपदा प्रहर आठी
नांदू दे रे गणराया—-
तरारला मळा बाई
दिसे स्वरगाचे सुख
खळखळ वाहे पाणी
वाफ्याची पुरवी भुक—
धाव्यावर चालू लागे
कारभाऱ्याची ही मोट
ढवळ्या पवळ्याची जोडी
तिथे नांदे एकजुट—-
विष्णु नारायण देवा
माझा सुखाचा संसार
सुवासींनी पूजिते मी
बाई पिंपळाचा पार—-
थोरली सुन घराची
पूजीते उंबरठ्याला
मागते सुख घराला
आयुष्य हळदी कुंकवाला—-
*शीला पाटील .चांदवड .(* नाशिक)