You are currently viewing डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना २०२३ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना २०२३ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

लोकांना विश्वासात घेऊन योग्य माहितीचा प्रसार केल्यास महामारीसारख्या साथीच्या रोगांवर मात करता येते हे कोरोना काळात सिद्ध झाले आहे, असा विश्वास वैद्यक क्षेत्रातील ख्यातकीर्त डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. सन २०२३ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली याचा मला मनस्वी आनंद होत आहे. क्षयरोग, बालरोग शास्त्र, एडस प्रतिबंध अशा वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी चव्हाण सेंटरतर्फे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंती कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना काळात सर्वच देशांनी लस संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली त्याचा चांगला फायदा झाला. मानवामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण देतो. अशा वेळी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणुकीची गरज असते.

सदर पुरस्कारासाठी मानकरी निवडण्यासाठी विख्यात अणुशास्त्रज्ञ, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूपा शाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री हे सदस्य म्हणून काम पाहतात. रु. ५ लाख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कारासंबंधीची माहिती दिली. डॉ. सौम्या स्वामिनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे सांगून डॉ. काकोडकर यांनी डॉ. सौम्या यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका विषद करून चव्हाण सेंटरच्या तीन दशकातील कार्याचा मागोवा घेतला. तसेच सध्या चव्हाण सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या समाजाभिमुख योजनांची महिती उपस्थितांना दिली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे कार्य चव्हाण सेंटर कसोशीने आणि प्रामाणिकपणे करत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार म्हणाले की, चव्हाण साहेब प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी कष्टाने शिक्षण घेतले. महाराष्ट्र राज्य प्रगती पथावर आणणे, हा त्यांचा ध्यास होता. विकासाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचेल, याची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांचा विचार समाजात अखंड रुजेल, असा प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटर करत असते. ते पुढे म्हणाले की, कृषी मंत्री असताना डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या बरोबर काम करता आले. फलोत्पादनावर त्यांनी केलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला, असे नमूद करून डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या कन्या डॉ. सौम्या यांनी चव्हाण सेंटरचा हा पुरस्कार स्वीकारला याबद्दल आनंद प्रकट केला.

याप्रसंगी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य आणि जीवनपट उलगडणाऱ्या नवीन परिपूर्ण संकेतस्थळाचे (www.yashwantraochavan.in) लोकार्पण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सेंटरच्या सीईओ, दीप्ती नाखले यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले, तर सरचिटणीस हेमंत टकले यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी निवड समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव, विवेक सावंत तसेच चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, विश्वस्त अजित निंबाळकर, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, जयराज साळगावकर, डॉ. प्रज्ञा पवार, शिक्षण तज्ज्ञ फरीदा लांबे, माजी महापौर विधी सल्लागार अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित भुरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा