You are currently viewing गझलकारा कल्पना गवरे यांच्या “कल्पनेचा फुलोरा” चे प्रकाशन थाटात संपन्न

गझलकारा कल्पना गवरे यांच्या “कल्पनेचा फुलोरा” चे प्रकाशन थाटात संपन्न

*स्नेहल आर्ट्स व एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड यांचे संयुक्त आयोजन*

 

पुणे: (प्रतिनिधी)

“कल्पनेचा फुलोरा” या गझलकारा कल्पना गवरे यांच्या गझलसंग्रहाचे रविवार दिनांक 10 मार्च रोजी पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम महाराज संकुलातील शांता शेळके सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन झाले. यावेळी राज्यभरातून ज्येष्ठ श्रेष्ठ गजलकार, साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गजलकार म. गा. चव्हाण, माजी सनदी अधिकारी तथा गझलकार दिलीप पांढरपट्टे, सुरेश भटांच्या मानसकन्या (गझलनंदा) सुनंदामाई पाटील, ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर, गझलकार रघुनाथ पाटील, गझलकार रवींद्र सोनवणे, विश्व गझल परिषदेचे अध्यक्ष डॉ.इक्बाल मिन्ने, म.सा.प.अध्यक्ष राजन लाखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्व सन्माननीय अथितींचा शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विशेष निमंत्रित मान्यवर मा.शिक्षण अधिकारी श्री.मकरंद गोंधळी, साकव्य अध्यक्ष गझलकार पांडुरंग कुलकर्णी, संवाद मीडियाचे कार्य.संपादक गझलकार दीपक पटेकर (दीपी), गुलाबनवाझ अशी उपाधी मिळालेले कवी श्री.बाबा ठाकूर, अनिलजी गुंजाळ आदींचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

तत्पूर्वी मा. प्राचार्य सौ.कल्पना गवरे यांच्या गझल संग्रह प्रकाशन व गझल गायन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शांता शेळके, सरस्वती देवी आदींच्या प्रतिमा पूजन व इशस्तवनाने झाली. या वेळी प्रसिद्ध गायक संगीतकार अतुल दिवे व गायिका वैशाली राजेश यांनी मान्यवर गझलकारांच्या विविध गझला आपल्या सुमधुर आवाजात संगीतबद्ध करून सादर केल्या, त्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यात प्रामुख्याने *”तुझ्या लाजण्याचा इशारा पुरेसा”*, *”जगून घे मनाप्रमाणे”, साथ दे तू मला एवढे मागते”*, *”आयुष्य छान आहे आकार पाहिजे रे… अध्यात्म जाणणारा ओंकार पाहिजे रे”*..,

*”येथे मनाप्रमाणे जगता कधी न आले”,*

*”रानात कोरड्या या पाऊस आज पडावा..”*,

*”हसत नाहीत आता माणसे… जगत नाहीत आता माणसे”,*

*”सोसून दुःख सारे हसतात माणसे”,*

*”तुझे ओठ सजने गुलाबी गुलाबी.. पुन्हा त्यात सजणे गुलाबी गुलाबी..”* अशा डॉ.इक्बाल मिन्ने, रवींद्र सोनवणे, कल्पना गवरे, श्री.दिलीप पांढरपट्टे, म. भा. चव्हाण, राजन लाखे, गझलकारा शिरढोणकर, आदींच्या बहारदार गझलांनी कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला, व *”काल स्वप्नात येऊन तू चुंबिले… काय सांगू तुला मी कसे वाटले”*.. या कल्पना गवरे यांच्या गझलेने बहारदार गझल गायनाची सांगता झाली. यावेळी आपले मनोगत मांडताना सौ.कल्पना गवरे यांनी आपल्या कविता ते गझल लेखनाच्या प्रवासाची माहिती देत सर्व उपस्थित गुरुवर्यांचे मार्गदर्शनासाठी आभार मानले. साकव्य मधून सुरू झालेला साहित्य प्रवास, विजोंचा गझल लिहिण्याबाबतचा सल्ला, दीपक पटेकर यांनी गझलांच्या सुचविलेल्या दुरुस्त्या, रघुनाथ पाटील, रवींद्र सोनवणे यांनी छडी घेऊन घोटवून घेतलेल्या गझला, रे.भा. भारस्वाडकरांच्या गझल कार्यशाळेत रे.भा., मिन्ने सर, तसेच बारकावे सांगून मेहनत घेणाऱ्या सुनंदामाई पाटील (गझलनंदा) आदींच्या आठवणी विशद केल्या आणि सर्वांचे आभार मानले.

 

*प्रमुख अतिथींची मनोगते*

“साहित्य निर्मिती आणि साहित्याचा आस्वाद हा एकांताचा उत्सव असतो. सामूहिक केलेली प्रार्थना ही जास्त प्रभावशाली असते, तशाच प्रकारे साहित्य श्रवण करण्यासाठी जेव्हा आपण सर्व एकत्र येतो त्यावेळी त्याचा विशेष आस्वाद घेता येतो”. असे मत म.सा.प. पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.

गझलकार सुरेश भट यांच्या मानसकन्या ज्यांना सुरेश भट यांनी “गझलनंदा” अशी उपाधी दिली त्या गझलकारा सुनंदामाई पाटील यांनी “कवी हा बोलका रसिक असतो.. आणि रसिक हा मुका कवीच असतो”.. असे सांगत कल्पना गवरे यांच्या गझल संग्रहाला आपली प्रस्तावना लाभलेली असून या गझल संग्रहात एकापेक्षा एक सरस गझलरचना समाविष्ट असल्याचे नमूद केले.

डॉ. इक्बाल मिन्ने यांनी व्यासपीठावरून सौ.कल्पना गवरे यांच्या गझलसंग्रहाचे रीतसर प्रकाशन झाल्याचे नमूद करून कल्पना गवरे यांच्या गझल संग्रहातील काही गझलांचे मतला व शेर आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. “जसा आजोबा झाल्यावर आनंद होतो, तसाच आनंद आपल्या शिष्याचे पुस्तक प्रकाशन झाल्यावर आज झाला”. असे सांगून “अवघ्या दीड वर्षात गझल संग्रह प्रकाशित केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे” असेही नमूद केले. “कवी हा जन्मावा लागतो, कवीला प्रेम कवितेबरोबरच सामाजिकता जपता आली पाहिजे. सामाजिक आशयाच्या रचना देखील लिहिता आल्या पाहिजेत” असेही ते पुढे म्हणाले.

माजी सनदी अधिकारी (आयएएस) मान. गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी “आपली कविता दुसऱ्यांना कळणे याचेही दुःख काही कवींना होते. तर काही कवींचे सांगणे तर त्याला स्वतःला आणि देवाला सुद्धा समजत नाही.” असे सांगत गझल ही सोपी लिहावी व ती कशी लिहावी यासाठी गालिबची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.

प्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांनी सौ.कल्पना गवरे यांच्या गझलसंग्रहाचे कौतुक केले.

प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे म.भा…! आपल्या मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे जेष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी “वृत्त सुधारता येतं पण वृत्ती सुधारता येत नाही. जो निर्भय नाही तो चांगलं लिहिणार नाही. गझलियत म्हणजे तुमची वृत्ती.. गझल हा निर्मळ झरा असतो, एकदा हा झरा वाहू द्या.. मग त्याला पाट घालून अडवता येतो, असं केल्यास आपोआप गझल येते” असे सांगत काही गझलांचे शेर सादर केले..

 

*महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद कडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान*

आजच्या या गझलसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात पिंपरी चिंचवड येथील काही कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र साहित्य परिषदकडून शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ.मनाली वैद्य, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सौ.कल्पना गवरे, पत्रकारितेतील दैदिप्यमान कामासाठी पत्रकार अश्विनी पवार, वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनिय योगदानासाठी डॉ.शैलजा माने आदींचा सन्मान करण्यात आला.

इथेच पहिले सत्र संपले व सर्वांनी भोजनाचा यथेच्छ आनंद घेतला.

 

*निमंत्रितांचा गझल मुशायरा*

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील नावाजलेल्या निमंत्रित गझलकारांचा गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. या गझल मुशायराचे अध्यक्ष विश्व गझल परिषद अध्यक्ष डॉ. इक्बाल मिन्ने होते.

यावेळी रघुनाथ पाटील यांनी,

*”फुटल्यानंतर तुझा आरशा कचरा होतो*

*घाव शेकडो शकलांमध्ये दुखरा होतो”*

 

*”गळणाऱ्या पानांनो इतके ध्यानी ठेवा..*

*नोंद आपली इतिहासाच्या पानी ठेवा”*

अशा बहारदार दोन गझला सादर केल्या.

गझलनंदा सुनंदामाई पाटील यांनी,

*”अस्तास सूर्य जाणे अंतिम सार आहे..*

*मज नेमके कळले अंती अंधार आहे..”*

व दुसरी

*”आभाळाला फुटला पाझर तू आल्यावर…”*

अशा दोन गझल सादर केल्या.

मा.सनदी अधिकारी गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी,

*”उडवाच मान माझी माझा नकार नाही..*

*इतकीच शर्थ आहे मी वाकणार नाही..”*

अशी गझल सादर करून सर्वांची वाहवा मिळविली.

सौ.कल्पना गवरे यांनी,

*”फुलांचेच जेव्हा असे वार झाले*

*नव्या वेदनांचे अविष्कार झाले”*

ही गझल सादर केली.

ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर यांनी जीवनावर आधारित..

*”इथवर आता जगून सुद्धा अजून काही मनात आहे..*

*अजून थोडे जगावयाच्या अजून भ्रमात आहे..”*

अशी भावस्पर्शी गझल सादर केली.

म. भा. चव्हाण हे तरुणाईला लाजवेल असं बहारदार व्यक्तिमत्त्व, त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत…

*”या जगण्याचा शौक लागला यातच आहे गोडी..*

*दारुड्यांनी मला पाजली दुनिया थोडी थोडी…”*

 

*”गावात लागलेली सर्वत्र आग आहे*

*झाले अशाच वेळी पाणी महाग आहे .*

*बोलावयास तुम्ही सांगू नका मभाला*

*तुमचा अजून त्याच्या डोक्यात राग आहे..”*

अशा अफलातून गझल सादर केल्या.

शेवटी रवींद्र सोनवणे यांनी

आपली

*”सोसून दुःख सारे हसतात माणसे”*

ही बहारदार गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

आभार गझलकार रवींद्र सोनवणे यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार, मजेशीर आणि उपस्थितांना खिळवून ठेवणारे सूत्रसंचालन श्री.संतोषजी घुले यांनी केले. सायंकाळी सर्वांनी एकमेकांच्या गाठीभेटी घेत पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाचा समारोप झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा