प्रथमेश तेली यांची विद्यार्थ्यांना विचारपूस
माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट; वैद्यकीय यंत्रणाही तैनात
सावंतवाडी :
सांगेली येथील नवोदय विद्यालयातील शिकणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली. सकाळी नाष्ट्यात वापरण्यात आलेल्या बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा शाळेतील शिक्षकांचा अंदाज आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली. मात्र त्याच ठिकाणी उपचार सुरू असल्यामुळे या ठिकाणी कोणीच आले नाही, असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
४३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच भाजपचे युवा नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी संबंधित मुलांना चांगल्या सुविधा द्या, अशा सूचना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सरपंच लवू भिंगारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य पंढरीनाथ राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.