You are currently viewing शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागतो

शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागतो

*शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागतो*

गणेश सुरवसेः ‘एमआयटी एडीटी’ स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या वाडेबोल्हाई ग्राम दत्तक योजनेची सांगता

पुणेः

शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा अन्नदाता आहे. हा बळीराजा जगला तरच आपण सर्वजन जगू शकतो. परंतु परिस्थितीनुरूप पारंपरिक शेतीत बदल न केल्यामुळे शेतकरी आता मागास होत चालला आहे. अवकाळी पाऊस व त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या नुकसानातून आलेल्या कर्जबाजारीपणामुळे बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खरंच काही करायचे असेल तर शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागेल, असे प्रतिपादन हवेली विभागाचे कृषीअधिकारी गणेश सुरवसे यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीतर्फे आयोजित वाडेबोल्हाई ग्राम दत्तक योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीच्या प्राचार्या डाॅ.अंजली भोईटे, वाडेबोल्हाई गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वैशाली केसवड, उपसरपंच सुमित शिंदे, ग्रामसेवक संतोष भोसले, उपक्रमाच्या संयोजक डाॅ.सुजाता घोडके, समन्वयक डाॅ.गणेश भावसार, डाॅ.निलेश कर्डिले व विद्यार्थी हजर होते.
सुरवसे यांनी याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांना उस, डाळी प्रक्रिया उद्योग, शेतीतील नवतंत्रज्ञान, शेतकऱ्यांना सध्या भेडसावणाऱ्या समस्या याबद्दल इत्यंभूत माहिती दिली. तसेच त्यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांसाठी भारत सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहितीही गावाकऱ्यांसह विद्यार्थ्यांना करून दिली.
याप्रसंगी बोलताना डाॅ.भोईटे यांनी स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीने ग्राम दत्तक योजना व या श्रमशिबिराला आपल्या अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून न चुकता ग्राम दत्तक उपक्रमाचे आयोजन जाते. यंदा शेवटचे वर्ष असून या उपक्रमाच्या माध्यमाधून विद्यार्थी अनेक लोकउपयोगी उपक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतात. आठ दिवसांच्या या श्रमशिबिरातून आमच्या विद्यार्थ्यांना शेती जवळून अनुभवण्याची संधी मिळते.
याप्रसंगी, सरपंच सौ.केसवड व उपसरपंच शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या सर्व उपक्रमांना पाठींबा दर्शविला.

*चौकट*
*विद्यार्थ्यांनी राबविलेले उपक्रम*
१. वृक्षारोपण
२. विविध मुद्द्यांवर सर्वेक्षण, माहिती व मार्गदर्शन
३. अन्नप्रक्रिया उद्योग, पिकाचे काढणीनंतरचे नुकसान, साक्षरता या विषयांवर माहिती
४. आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता,अन्न सुरक्षा व स्वच्छतेबद्दल लोकजागृती
५. प्लास्टिक ड्राईव्ह- कचरा उच्चाटन
६. निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर
७. पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता व जतन
८. शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन

प्रतिक्रिया व्यक्त करा