You are currently viewing स्मृति भाग ५४

स्मृति भाग ५४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५४*  

                  

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

दोन दिवस मी मोबाईलचे संपर्कात नसल्यामुळे ५४ वा भाग देण्यास उशीर होत आहे , क्षमस्व .

प्रातः स्नान का करावे ? त्या संदर्भात एक उत्तम श्लोक दक्षांनी सांगितला आहे .

 

*क्लिद्यन्ति हि प्रसुप्तस्य इन्द्रियाणि स्रवन्ति च ।*

*अङ्गानि समतां याति उत्तमान्यधमैः सह ॥*

झोपलेल्या मनुष्याची इन्द्रिये ओली होतात ( क्लिद्य — चिपचिपीत ओल्यासारखी ) आणि मालिन्याचा स्त्राव करत रहातात . त्यामुळे उत्तम अंग ही अधम अंगासमान होते .

हे नऊ छिद्रांनी युक्त असलेले शरीर अत्यंत मलीन आहे . यात दिवसरात्र स्त्राव होत असतो . प्रातःकाळी स्नान करणे , ही याची शुद्धि आहे . तसे सूर्योदय व सूर्यास्त काळी , अशा दोन वेळेस स्नानाचा उपदेश आहे . प्रातः स्नान हे दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही प्रकारच्या प्रयोजनांची सिद्धि देणारे असते , असे दक्ष प्रजापति तसेच इतर ऋषि सांगतात . पुढे , ऋत्विज—पुत्र—गुरु—बंधु—भाचा आणि जावाई यांचे द्वारा करवलेला यज्ञ हा वास्तविक स्वतःच केलेला समजावा ! असे ही सांगून ठेवले आहे . हे निवेदन पर्यायासाठी उत्तम वाटते .

 

*देवकार्य्याणि पूर्व्हाण्हे मनुष्याणाञ्च मध्यमे ।*

*पितृणामपराण्हे च कार्य्याण्येतानि यत्नतः ॥*

देवांचे प्रति कार्य दिवसाचे पूर्वभागात , मनुष्यांचे प्रति मध्यभागात व पितरांचे प्रति अपराण्ह काळात सर्वच्या सर्व यत्नपूर्वक केले गेले पाहिजेत .

दिवसाचे पूर्वभागात करावयाचे कर्म सन्ध्याकाळी कधीच करु नये . त्याने योग्य फल मिळत नाही . अशी सूचनाही लगेच केलेली आहे . तेजस्विता , तत्परता , तन्मयता हे तीन तकार कुठलेही कार्य करताना हवेच ! वेदाभ्यास किती प्रकारचा असतो , या बाबत पुढील श्लोक येतो .

 

*वेदस्वीकरणं पूर्वं विचारोSभ्यसनं जपः।*

*ततो दानञ्च शिष्येभ्यो वेदाभ्यासो हि पञ्चधा ॥*

वेदाभ्यास पाच प्रकारचा आहे . १)वेदांचे ज्ञान प्राप्त करणे , २) त्यावर मनन करणे , ३) शिकलेल्या गोष्टींची आवृत्ति करणे , ४) त्याचा जप करणे आणि ५) ते शिष्यास देणे .

प्रत्येक शिकलेला मंत्र वा श्लोक वा कथा वा वाक्य वा शब्द शंभर वेळा म्हटला की तो जिभेवर नाचत असतो . आठवायची गरज नसते . हे शास्त्र आहे . तेच *आवृत्ति* म्हणून समजावे . *कृतस्य पुनः पुनः करणं अभ्यासः ।* म्हणजे केलेले पुन्हा पुन्हा करण्याला अभ्यास म्हणतात . आवृत्ति करतांना मन सहकारी असतेच असे नाही , म्हणून पुन्हा जप सांगितला आहे . आणि शिष्यास दिल्याशिवाय जर वेदाभ्यास पूर्ण होत नसेल तर किती जणांचा आजवर अपूर्ण राहिला असेल ना ? या श्लोकाने खूप मोठी शिक्षा मिळते . आपण ज्यांचे पोषण केले पाहिजे त्यास पोष्यवर्ग म्हणतात . तो श्लोक पुढे —

 

*पिता माता गुरुर्भार्य्या प्रजा दीनाः समाश्रिता ।*

*अभ्यागतोSतिथिश्चान्यः पोष्यवर्ग उदाहृतः ॥*

वडील , आई , गुरु , पत्नी , सन्तान ( प्रजा ) , दीन , शरण आलेले , अभ्यागत आणि अतिथी हा पोष्यवर्ग आहे .

 

*ज्ञातिर्बन्धुजनः क्षीणस्तथानाथः समाश्रितः ।*

*अन्येSप्यधनयुक्ताश्च पोष्यवर्ग उदाहृतः ॥*

नातेवाईक . बन्धुजन , क्षीण वा कमकुवत , अनाथ , आश्रयाला आलेले आणि अन्य धनहीन लोकांस पोष्यवर्ग सांगितले आहे .

अशांचे भरण पोषण हे स्वर्गप्राप्तीचे साधन सांगितले आहे . दिवसभरात वागतांना किती काळजी घेण्यास सांगितली आहे , ना ? स्वागत ही तर इथली संस्कृतीच आहे . खूप गोष्टी उकलतात !!

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 11 =