You are currently viewing वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*वाचाल तर वाचाल*

 

बाळाचा जन्म होतो, दिसामासाने बाळ वाढते, त्या ओल्या मातीच्या गोळ्याला माता ~ आजी~ आजोबा आकार देत असतात. पुढे शाळा, कॉलेज, विद्यापीठातून योग्य ते शिक्षण घेऊन समाजातील एक व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण होते.

महत्त्वाची गोष्ट ही की, व्यक्तीचा विकास, त्याचे चार लोकात उठून दिसणारे व्यक्तिमत्व कसे निर्माण होते?

सभोवतालची परिस्थिती ही व्यक्ती विकासाचा फार मोठा घटक आहे. एखाद्या घरात, जेथे सांस्कृतिक विचार नाहीत, चांगल्या ग्रंथांचे वाचन नाही, सतत वाद~विवाद आणि भांडणे होत असतील तर त्या घरातील लहान मुले भेदरलेल्या, घाबरलेल्या अवस्थेत लहानाची मोठी होतात. त्यांची शारीरिक तसेच बौद्धिक वाढही खुंटलेली असते. या उलट ज्या घरात नित्य कथा~ कीर्तने,उत्तम प्रतीच्या विचारांचे पालन, ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध अशा ग्रंथांचे वाचन होत असते त्या घरातील मुलांवर आपोआपच चांगले संस्कार घडत असतात. आई वडील त्यांच्या मुलाला बाल साहित्यापासून वाचण्याची गोडी निर्माण करतात. पुढे मोठे होऊन ही मुले बहुश्रुत होतात, त्यांची बुद्धी प्रगल्भ होते, व्यक्तिमत्व आकर्षक होते आणि समाजात त्यांना मानाचे स्थान मिळण्यास मदत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम वाचताना बाहू स्फुरण पावतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेविषयी वाचताना महाराजांविषयी मनात आदरभाव निर्माण होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र वाचून देशाभिमान ओसंडून वाहू लागतो. लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्राने गोऱ्यांना पळवून लावण्याचे सामर्थ्य जनतेला मिळाले. आजही आम्हाला भारताचा हा इतिहास वाचावासा वाटतो, गात्रा गात्रात बळ आल्यासारखे वाटते.

रामायणाच्या, महाभारताच्या कथा वाचा. पित्याचे वचन पाळून कृतार्थ होणारा राम, रावणाचा वध करणारा पराक्रमी राम आपल्याला आवडतो. महाभारतात वस्त्रहरण समयी द्रौपदीचा कृष्णासाठी केलेला धावा वाचून मन कळवळते आणि त्याच वेळी “भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी” या परमेश्वराच्या कृपेची खात्री वाटते. आपोआपच मनोधैर्य वाढते.

बालकवींचा ऐल तटावरून वाहणारा निळा सावळा झरा आणि त्या झऱ्याच्या जळात पाय टाकून बसलेला औदुंबर आपल्याला निसर्गाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी देतो. ना.सि. फडक्यांच्या कादंबऱ्यांतून सच्चा प्रेमाची कल्पना येते.वि.स. खांडेकर, पु. भा.भावे,व. पु. काळे पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. पु. ल. देशपांडे यांच्या रावसाहेब, हरी तात्या, सखाराम गटणे, नारायण वगैरे व्यक्ती वाचून समाजातील भिन्न प्रकृतींच्या माणसांची चांगलीच ओळख होते.

” आधी हाताले चटके

तेव्हा मिळते भाकर”

फार मोठे जीवनाचे तत्वज्ञान बहिणाबाई सांगून जातात. जेव्हा संसाराचे चटके बसतात तेव्हा या ओळींची आठवण येते. एक मात्र नक्की की या वाचनामुळे मन परिपक्व होते, समोरच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ अंगी येते.

शेक्सपियरची रोमिओ आणि ज्युलियेटच्या असफल प्रेमाची कथा

मन व्यथित करते हे खरे.

 

 

केवळ संशयामुळे अथेल्लो त्याच्या फुलासारख्या कोमल डेस्डेमोनाला ठार मारतो हे क्रौर्य कर्म

आपल्याला रुचत नाही, परंतु समाजाचे सर्वांगीण दर्शन केवळ वाचनानेच घडू शकते हे यावरून समजते.

प्रत्येकच अनुभव प्रत्येकाने घेतलेला नसतो, पण नानाविध विषयाच्या वाचनाने दृष्टीच्या कक्षा रुंदावतात, ज्ञानार्जन होते आणि मनोरंजन तर होतेच होते. मनावरील ताण घालवण्यासाठी मनोरंजन हा रामबाण उपाय आहे हे ज्ञातच आहे.

आजकाल सबकुछ इन्स्टंट असा जमाना आला आहे. इतकी जाडी जाडी पुस्तके कोण वाचत बसणार? माझ्या तर असे लक्षात आले आहे की अहो, हल्लीचे विद्यार्थी क्रमिक पुस्तके वाचतच नाहीत, त्या त्या विषयांचे गाईड आणि गाईड मध्ये दिलेली निवडक प्रश्नोत्तरे वाचूनच परीक्षेची तयारी करतात आणि पदव्या संपादन करतात.

असे नका हो करू. पुस्तके मनापासून वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वंकष विकास करा. कोणत्याही विषयावर तुमचे स्वतःचे योग्य असे मत निर्माण करण्याची क्षमता असू द्या ते प्रतिपादन करण्याचा आत्मविश्वास असू द्या.

वाचन सोडू नका! वाचाल तरच वाचाल हे ध्यानी असू द्या.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 13 =