*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित व्यक्तिविशेष लेख*
*प्राचार्य डॉ उदय नावलेकर*:
*शिक्षणक्षेत्रातील तारा*
*भाग १*
शिकविले ज्यांनी किंवा प्रेरणा ज्यांनी दिली ते गूरू ! २४ जणांना भगवान दत्तात्रयांनी गुरू मानले. प्रत्यक्षात त्या २४ गुरूंना पण कल्पना नसावी आपल्या गूरूत्वाची !आयुष्यात आपण नविन शिकत असतोच किंवा प्रेरणा घेत असतो. एकलव्य गुरू द्रोणाचार्यांच्या पूतळ्यापासूनही शिकले !
मी स्वतः ज्यांना प्रत्यक्ष भेटले नाही ,ते मला वयाने लहान असूनही गूरू वाटले ! माझ्या जीवनाला नवीन अर्थ मिळवून देणाऱ्या अशाच एका गुरुबद्दल लिहिण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे.
आपल्या असामान्य विद्वतेमुळे शिक्षणक्षेत्रात ज्यांचे नाव अतिशय आदराने घ्यावे असे यवतमाळच्या आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे नामवंत प्राचार्य डॉक्टर उदय नावलेकर! त्यांचे व्यक्तिमत्व इतके अनाकलनीय आहे की ; मी त्यांच्याविषयी लिहिणे म्हणजे मुंगीने एव्हरेस्ट शिखरावर पोहचण्याची इच्छा करणे होय! त्यांच्याबद्दल माहिती गोळा करतांना किंवा त्यांच्याशी बोलतांना माझ्या हे सहज लक्षात आले की, डॉक्टर उदय नावलेकर ह्यांना पूर्णपणे ओळखणे हे माझ्या
आवाक्याबाहेरचे आहे.
फोनवर बोलतांना त्यांच्या आवाजावरून त्यांची बौद्धिक उंची मोजण्याच्या पलीकडे आहे,हे माझ्या लक्षात आले.मार्मिक बोलणे हा त्यांचा स्थायी भाव आहे .त्यांच्याशी बोलतांना समोरचा आपल्या मनातले कोणतेही विचार लपवून ठेवू शकत नाही हे त्यांचे खास वैशिष्ट्य, मी स्वतः अनुभवलेले!हा त्यांचा दैवी गुण की ते क्षणार्धात समोरच्या व्यक्तीचे अंतरंग ओळखतात ,अगदी आरपार! एकप्रकारे आपल्या स्वभावाची चिरफाड करून मोकळे होतात .ते स्वतःही दिलखुलासपणे आपल्याशी संवाद साधतात .हे विश्वचि माझे घर या उक्तीप्रमाणे त्यांच्या मनात सगळ्याविषयी अपार कळवळा आहे. अतिशयोक्ती वाटेल पण माझा विश्वास आहे की नक्कीच त्यांच्यावर दैवी शक्तीचा वरदहस्त आहे. त्यांच्याशी बोलतांना आपण आपल्या खूप जवळच्या मित्राशी बोलतो आहोत असं वाटू लागते. डॉक्टर नावलेकरांनी पारवेकर महाविद्यालयाचा कायापालट केला आहे. अमरावती विद्यापीठाने उत्कृष्ट प्राचार्य पूरस्कार देवून त्यांना सन्मानित केले ते उगीच नाही.
डॉ उदयजी सुरवातीला उमरखेड येथे गावंडे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. आपल्या प्राध्यापकी जीवनात त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला.३४ वर्षांचे असतांना डॉ नावलेकर प्राचार्य म्हणून पारवेकर महाविद्यालयात रुजू झाले. त्यांच्या कामाचा झपाटा काही औरच ! विद्यापीठाचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार पारवेकर महाविद्यालयाला मिळाला.बोअर किंवा नळाचे पाणी उपलब्ध नसतांनाही टॅंकरने पाणी आणून त्यांनी झाडे जगवली, फुलवली हे त्यांचे कर्तृत्व! महाविद्यालयाला नॅक उत्कृष्ट मानांकन मिळाले. नॅकचे पीअर टीम मेंबर म्हणून त्यांची निवड झाली .अनेक प्राध्यापकांना त्यांनी मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी अनुदान मिळवून दिले . त्यांना “प्लेसमेंट “ह्या प्रमोशनल फिल्मसाठी राष्ट्रीय स्तरावर जर्मन कंपनी बॉश तर्फे पन्नास हजार रुपयांचें बक्षीस मिळाले आहे . आपल्या क्षेत्रात नाव कमावणारे अनेक विद्यार्थी नावलेकर सरांनी घडविले. उदा. आयएएस झालेले अंदमान निकोबारचे कलेक्टर अझरुद्दीन काझी, भारताचा हॉकी गोलकीपर आकाश चिकटे, आयपीएल आणि रणजी क्रिकेटर अक्षय कर्णेवार ,नॅशनल खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्लेअर स्मिता बोनकीले, गोल्ड मेडालिस्ट प्रीतम सरग अशा नावांची मोठी यादीच आहे.कृतज्ञ व कृतघ्न अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा आपण अनुभव घेतो तसा डॉक्टरांनीही घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना आता माणसे चांगल्या प्रकारे वाचता येतात.आपण नेहमी म्हणतो की सरस्वती व लक्ष्मी एकत्र राहत नाहीत पण डॉक्टरांच्या जीवनात लक्ष्मी व सरस्वती दोघी त्यांच्या सोबत आहेत. लहान वयापासून अनेक चढउतार त्यानी पाहिले. उदा. शिक्षण घेत असतांनाच त्यांचे वडील वारले तेंव्हा अंत्यसंस्कारासाठी ही त्यांच्याकडे पैसे नव्हते, ही गोष्ट ते कधीच विसरू शकत नाहीत.
पांढरकवडा हे त्यांचे मूळ गाव! शेजारी राहणाऱ्या प्रसन्न , स्मितहास्य असणाऱ्या रश्मी रानडेंशी त्यांचा विवाह झाला. ही सुंदर जोडी देवांनेच बनवलेली असावी .चांदीच्या मंगळसूत्रानेच संसाराला सुरवात झाली आणि रश्मीताई लक्ष्मीच्या रूपाने त्यांच्या गृहलक्ष्मी झाल्या.देवाने हा लक्ष्मी नारायणाचा जोडा आधीच ठरविला होता. Made for each other!
नावलेकर दाम्पत्याचे वैवाहिक जीवन अतिशय सुखाचे,आनंददायी आहे. त्यांचा मुलगा सार्थक डॉक्टर आहे तर मुलगी सृष्टी इंजिनिअर असून जर्मनीत झलॅंडो कंपनीत लीड पदावर आहे.
क्रमशः
लेखन:प्रतिभा पिटके
९४२१८२८४१३