You are currently viewing २७ रोजी विधान भवनावर गिरणी कामगार ‘आक्रोश’ मोर्चाने धडकणार!

२७ रोजी विधान भवनावर गिरणी कामगार ‘आक्रोश’ मोर्चाने धडकणार!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या‌ प्रश्नावर विधानभवनावर आयोजित करण्यात आलेला २८ फेब्रुवारी रोजीचा “आक्रोश मोर्चा” अर्थसंकल्प जाहीर होत‌‌ असल्यामुळे मंगळवार दि. २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर प्रचंड संख्येने धडकणार आहे.

 

दि. ७ फेब्रुवारीला लालबाग, भारतमाता सिनेमागृह येथे आयोजित करण्यात आलेले गिरणी कामगार आणि चाळ रहिवाश्यांचे “धरणे आंदोलन” चांगलेच गाजले. एकही गिरणी कामगार हक्काच्या घरांपासून वंचित रहाता कामा नये! मुंबई शहर विकास नियमावली अंतर्गत गिरणी चाळींत रहाणार्‍या कामगार आणि उपभोगता रहिवाशांच्या धोकादायक चाळींची पुनर्बांधणी तेथेच झाली पाहिजे! आदी मागण्या करण्यात आल्या.

 

आतापर्यंत घरांसाठी १ लाख ७५ हजार कामगारांनी फॉर्म भरले आहेत. कामगार संघटना कृती संघटनेने केलेल्या गेल्या दहा वर्षांच्या लढ्यात फक्त १६ हजार घरे गिरणी कामगारांना सोडतीत लागली. मग १ लाखावरील कामगारांना घरे कधी मिळणार? उपलब्ध जागा कमी आणि घरांची मागणी मात्र अधिक, अशी स्थिती आहे! गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने २१ ऑगस्ट २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घराच्या प्रश्नावर कामगार संघटनेने भेट घेऊन चर्चा केली होती. कृती संघटनेने सूचविलेल्या कोणत्याही तोडग्याचा शासनाने अद्यापपर्यंत तरी विचार केलेला नाही. उलट राज्य सरकार मागील सरकारच्या काळात सोडतीत लागलेल्या घराचे वाटप करीत आहेत, पात्रता निश्चिती प्रकरणात अतार्किक अटी लादून कामगारांना घरे कमी कशी मिळतील, असा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

 

सदर प्रश्नावर गिरणी कामगार कृती संघटनेने मुंबईतील सर्वच आमदारांना एक मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले आहे. गिरणी कामगारांच्या या जिव्हाळ्याच्या आणि हक्काच्या प्रश्नावर विधानसभेत त्यांनी आवाज उठवावा आणि आझाद मैदानावरील कामगारांच्या आक्रोश आंदोलनात कामगारांना मार्गदर्शन करावे, अशी आग्रही विनंती कामगार संघटना कृती कृती संघटनेच्या वतीने सन्माननीय आमदारांना करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांच्या आक्रोश आंदोलनाचे पडसाद आता विधानसभेतही उमटणार आहेत! विधानसभा अधिवेशन २६ फेब्रुवारी ते १ मार्च पर्यंत चालू रहाणार आहे.

 

२७ फेब्रुवारी रोजीचे आक्रोश आंदोलन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करणारे ठरावे,असे आवाहन कामगार नेते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी मागील धरणे आंदोलनात केले होते. त्यानुसार महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सभा घेण्यात येत आहेत. कोल्हापूर येथे संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या सभेत सचिन अहिर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेली सभा चांगलीच गाजली आहे. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण आणि आण्णा शिर्सेकर यांच्या द्वारे मालवण येथील सभा गिरणी कामगारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास महत्त्वाची ठरली आहे. पुणे, सातारामधील सभा समाजसेवीका उज्वला भगत, कार्यकर्ते विलास जगताप आणि संघटन सेक्रेटरी नामदेव झेंडे यांच्या प्रयत्नाने पार पडत आहेत.

 

सावंतवाडी आणि आजूबाजूच्या कोकणपट्टीतील गिरणी कामगारांमध्ये जनजागृतीसाठी उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांनी प्रचाराची राळ उठविण्याचा निर्धार केला आहे.

 

घरे लाभलेल्या किंवा घरापासून वंचित असलेल्या हजारो कामगारांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.

 

कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे आणि सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर विविध गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून २७ तारीखेचे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करीत आहेत.

 

मु़ंबईत कामगार आघाडीचे कार्यकर्ते असलेल्या डिलाईल रोड, घाटकोपर येथे महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे सभा घेणार आहेत. घाटकोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील गिरणी कामगारांसाठीची सभा सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घाटकोपर,पूर्व येथील पराग हायस्कूलच्या पटांगणावर पार पडली.

 

काही अपरिहार्य कारणास्तव लाखभर गिरणी कामगार शासनाच्या घरकुल योजनेला दुरावले आहेत, अशा कामगारांसाठी सरकारने फॉर्म भरण्याची एकदा संधी द्यावी, अशी या आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. गिरणी कामगारांना त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे मुंबईतच घरे मिळाली पाहिजे, ही मागणीही पुढे आल्याने गिरणी कामगारांमध्ये या आंदोलनाविषयी औस्त्युक्य निर्माण झाले आहे. तेव्हा हे आंदोलन कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून, यशस्वी करतील, असा विश्वास कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजीमंत्री सचिन अहिर, गिरणी कामगार कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र गिरणी‌ कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, सेक्रेटरी जयंवत गावडे, संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल. हे आदोलन यशस्वी होण्यासाठी चाळ रहिवासी कृती समितीचे पदाधिकारी भाऊसाहेब आंग्रे, किरण गावडे, महेश हेंद्रे यांच्यासह कामगार, रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे ठरविले आहे. येत्या २७ तारखेचे गिरणी कामगारांचे आक्रोश आंदोलन “न भुतो न भविष्याती!” ठरेल, असा सर्वत्र विश्वास व्यक्त होताना दिसत आहे!

प्रतिक्रिया व्यक्त करा