आरोंदा खाडीपात्रात वेत्ये येथील महिलेची आत्महत्या…?
सावंतवाडी
आरोंदा-शेपुतेवाडी येथील खाडीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. प्रेमलता मनोहर गावडे (वय ७०, रा. वेत्ये-नमसवाडी) असे त्या महिलेचे नाव आहे. तिने आजारपणामुळे आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिलेच्या पतीचे निधन वीस वर्षांपूर्वी झाले आहे तर दोन महिन्यांपासून गावडे ह्या आजारी होत्या. त्यामुळे त्या आजाराला कंटाळल्या होत्या. त्यामुळे माझे पुढे काय होणार हे विचारायला भटजींकडे जातो, असे पुतण्याची पत्नी स्वप्नाली गावडे यांना सांगून २३ फेब्रुवारीला सकाळी निघून गेले. यावेळी संध्याकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना खडीपात्रात दिसून आला. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील केरकर यांना दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून यांना कोण ओळखत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. यावेळी संबंधित नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली व ओळख पटविली. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता गायकवाड, पोलीस बाबुराव जाधव, प्रदीप नाईक, सौ.कदम घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.