मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात मुंबईकडून यास्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर यांनी दमदार कामगिरी केली. दोघींमध्ये ५६ धावांची भागीदारी झाली. यास्तिकाने ५७ धावांची स्फोटक खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. तर कर्णधार हरमनप्रीतने ५५ धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सदरलँडच्या हाती एलिस कॅप्सीने झेल देण्यास भाग पाडले. ज्या वेळी संघाला एका चेंडूवर पाच धावा हव्या होत्या, तेव्हा सजना सजीवनने पहिल्या सामन्यात सामना जिंकणारा षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्ध २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. दिल्लीकडून एलिस कॅप्सीने ७५ धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान तिने १४१.५० च्या धावगतीने आठ चौकार आणि तीन षटकार मारले. तर जेमिमाह रॉड्रिग्जने ४२ धावा केल्या. मात्र, तिला या डावाचे अर्धशतकात रूपांतर करता आले नाही. कर्णधार मेग लॅनिंगने मुंबईविरुद्ध ३१ धावा केल्या. त्याचवेळी शेफाली वर्माने १ धाव, मारिजन कॅपने १६ धावा आणि ॲनाबेल सदरलँडने १ नाबाद धावा केल्या. दिल्लीविरुद्ध मुंबईकडून नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय शबनिम इस्माईलला यश मिळाले.
१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाची पहिली विकेट पडली. हिली मॅथ्यूज खाते न उघडता तंबूमध्ये परतली. यानंतर यास्तिका भाटियाने ५७ धावांची तुफानी इनिंग खेळून संघाला संकटातून बाहेर काढले. दिल्लीविरुद्ध नताली सिव्हर ब्रंटने १९, अमेलिया केरने २४, पूजा वस्त्राकरने १ धावा केल्या. त्याचवेळी अमनजोत कौर तीन धावा करून नाबाद राहिली आणि सजीवन सजना सहा धावा करून नाबाद राहिली. दिल्लीकडून अरुंधती रेड्डी आणि ॲलिस कॅप्सीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय मारिजन कॅप आणि शिखा पांडे यांना प्रत्येकी एक यश मिळाले. हरमनप्रीत कौरला तिच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.