You are currently viewing ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

मालवण

मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार दिनांक २३ डिसेंबर पासून बीए, बीकॉम, बीएससी या शाखांच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा, तसेच २ जानेवारी २०२० पासून या शाखांच्या प्रथम व तृतीय सत्राच्या नियमित परीक्षा सुरू होत आहेत. यासाठी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. परंतु आमच्या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात तसेच कित्येक विद्यार्थी डोंगराळ अथवा दुर्गम भागात देखील राहतात. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्या मध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. या अडचणींवर मात करण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या गावातील अथवा घराच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहाय्य करावे, असे आवाहन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले आणि परीक्षा विभाग यांनी केले आहे. गावातील पोस्ट ऑफिस, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी अथवा ग्रामसेवक कार्यालय, सायबर कॅफे, कॉम्प्युटर क्लासेस इत्यादी मधील वायफाय तसेच संगणक वापरण्याची मुभा या विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि उत्तम वाय-फाय कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे, अशांनी या सुविधा विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी मध्ये मोफत उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनही प्राचार्य डॉ. मंडले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा