आचरेकर प्रतिष्ठानच्या ‘मच्छिंद्र कांबळी’ स्मृति नाट्य महोत्सवाला आजपासून प्रारंभ
कणकवली
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली ४६ वर्ष सांस्कृतिक चळवळ राबवित आहे. कणकवली आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून या माध्यमातून समाज भान देण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. संस्थेच्या प्रतिवर्षी होणाऱ्या कायमस्वरूपी उपक्रमांमधील नाट्य उत्सव हा एक उपक्रम आहे या मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाची सुरवात शुक्रवार २३ फेब्रुवारी रात्री ९ पासून होत असून या नाट्य महोत्सवाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालरंगभूमीवर काम करणारे आणि यावर्षीचा दीधी समाजभान पुरस्कारप्राप्त डॉ. राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार यानिमित्ताने आयोजित केला आहे या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ लेखक प्रा.प्रवीण बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकामध्ये पुढील संस्थांचा सहभाग असणार आहे.
23 फेब्रुवारी 2024 रोजी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित- कृष्ण किनारा,
24 फेब्रुवारी रोजी फ्लेमिंगो गोवा निर्मित- बोरो आणि मुकभट ही दोन दीर्घांक , 25 फेब्रुवारी रोजी एनसीपीए निर्मित – कलगीतुरा,
26 फेब्रुवारी रोजी बाबा वर्दम थिएटर कुडाळ निर्मित- त्या तिघांची गोष्ट,27 फेब्रुवारी रोजी भद्रकाली प्रोडक्शन चे- माझ्या बायकोचा नवरा, 28 फेब्रुवारी रूपक निर्मित- प्रिय भाई एक कविता हवी आहे, 29 फेब्रुवारी रोजी जागर आणि गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज निर्मित – कवी जातो तेव्हा, ही आठ नाटके सादर होणार आहेत यामध्ये मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध कलावंत गजानन परांजपे, सागर देशमुख, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर आणि मुक्ता बर्वे यांचा सहभाग असणार आहे.
या संपूर्ण नाट्यमहोत्सवाच्या प्रवेशिकेची फी 1500/- 1000/- व 500/- एवढी असून या कलाकृतींचा आनंद घेण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी केले आहे.