*कसोटीतील सर्वात मोठा विजय नोंदवत मालिकेत घेतली २-१ अशी आघाडी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ४३४ धावांनी जिंकला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३१९ धावा करू शकला. भारताला १२६ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने ४३० धावा करत डाव घोषित केला आणि बेन स्टोक्सच्या संघासमोर ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ १२२ धावा करून सर्वबाद झाला.
राजकोट येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. याआधी २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ३७२ धावांनी विजय मिळवला होता. तर २०१५ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ३३७ धावांनी जिंकला होता. २०१६ मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभव केला होता. याशिवाय २००८ मध्ये मोहालीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२० धावांनी विजय मिळवला होता.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव झाला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. १९३४ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ५६२ धावांनी पराभव केला होता. १९३४ मध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पराभव आहे. इंग्लंडचा तिसरा मोठा पराभव वेस्ट इंडिजविरुद्ध होता. १९७६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात इंग्लिश संघाचा ४२५ धावांनी पराभव झाला होता. १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४०९ धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इंग्लंडचा ४०५ धावांनी पराभव केला. इंग्लंडचा हा पाचवा सर्वात मोठा पराभव ठरला.
भारताने दुसरा डाव चार गड्यांच्या मोबदल्यात ४३० धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वाल २३६ चेंडूत १४ चौकार आणि १२ षटकारांसह नाबाद राहिला. त्याचवेळी सर्फराजने ७२ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. दोघांमध्ये १५८ चेंडूत १७२ धावांची तुफानी भागीदारी झाली जी नाबाद होती. तत्पूर्वी, चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल ९१ धावा करून बाद झाला तर कुलदीप यादव २७ धावा करून बाद झाला. तर, शनिवारी रोहित शर्मा १९ धावांवर आणि रजत पाटीदार खाते न उघडताच बाद झाला. इंग्लंडकडून रूट, हार्टले आणि रेहान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दुसऱ्या डावात बैजबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंड संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. मार्क वुडशिवाय एकाही फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. जॅक क्रॉली ११ धावा करून आणि बेन डकेट चार धावा करून बाद झाला. कर्णधार बेन स्टोक्सला केवळ १५ धावा करता आल्या. त्याला कुलदीप यादवने बाद केले. याशिवाय ऑली पोपने तीन, रूटने सात, बेअरस्टोने चार, बेन फॉक्सने १६, रेहान अहमदने शून्य, टॉम हार्टलीने १६ धावा केल्या. तर, जेम्स अँडरसन एक धाव घेऊन नाबाद राहिला. इंग्लंड १२२ धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. त्याचबरोबर बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक यश मिळाले. जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिसऱ्या दिवशी अचानक चेन्नईला परतलेला रविचंद्रन अश्विन आज पुन्हा संघात दाखल झाला आणि त्याने विकेटही घेतली.
या मोठ्या विजयाचा टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून ५० गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी ५९.५२ वर पोहोचली आहे. भारताने ५५ टक्के गुण मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेवरील दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर न्यूझीलंड संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी ७५ आहे. त्यांनी आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. २०२३-२५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाने १० कसोटी सामने खेळले आहेत आणि सहा जिंकले आहेत. कांगारूंना तीनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने सात कसोटी सामने खेळले असून चार जिंकले आहेत. टीम इंडियाने दोन सामने गमावले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
यशस्वीने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले. त्याचवेळी सरफराजने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. यशस्वी आणि सरफराज यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाने षटकारांचा खास विक्रम केला.
सलग दोन कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत विनोद कांबळी आणि विराट कोहलीची बरोबरी केली. कांबळीने १९९२-९३ मध्ये ही कामगिरी केली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने इंग्लंडविरुद्ध २२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २२७ धावांची इनिंग खेळली. त्याच्यानंतर कोहलीचा नंबर लागतो. विराटने २०१७-१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपुरात २१३ आणि दिल्लीत २४३ धावा केल्या होत्या. आता यशस्वी त्यांच्या यादीत सामील झाला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध २०९ धावा केल्या होत्या. आता राजकोटमध्ये २१४ नाबाद धावा केल्या.
*दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारा यशस्वी हा सहावा भारतीय फलंदाज ठरला:-*
१) मन्सूर अली खान पतौडी इंग्लंड दिल्ली १९६४ २०३ नाबाद
२) दिलीप सरदेसाई वेस्ट इंडीज मुंबई १९६५ २०० नाबाद
३) सुनील गावस्कर वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन १९७१ २२०
४) सुनील गावस्कर इंग्लंड ओव्हल १९७९ २२१
५) व्हीव्हीएस लक्ष्मण ऑस्ट्रेलिया कोलकाता २००१ २८१
६) वसीम जाफर वेस्ट इंडीज अँटिग्वा २००६ २१२
७) यशस्वी जैस्वाल इंग्लंड राजकोट २०२४ २१४ नाबाद
यशस्वी जैस्वालने आपल्या डावात १२ षटकार ठोकले. कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला. त्याने वसीम अक्रमच्या २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. अक्रमने १९९६ मध्ये शेखूपुरा (पाकिस्तान) येथे झिम्बाब्वेविरुद्ध १२ षटकार ठोकले होते. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, न्यूझीलंडचा नॅथन ॲस्टल, ब्रेंडन मॅक्युलम (दोनदा), इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि श्रीलंकेचा कुसल मेंडिस यांनी एका डावात प्रत्येकी ११ षटकार ठोकले आहेत.