You are currently viewing शाळा, महाविद्यालये १००% बंद

शाळा, महाविद्यालये १००% बंद

जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचा दावा : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी नियुक्तीला विरोध

ओरोस :
शाळा, महाविद्यालयांमधून कंत्राटी पद्धतीने चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्त करण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या आपत्तीतून शिक्षण क्षेत्र नुकतेच सावरत असताना खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदे गोठवून त्या जागी कंत्राटी स्वरुपात शिपाई भत्ता देऊन नवीन चतुर्थश्रेणी कर्मचारी नेमण्याबाबतचा नवा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. त्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेची शाश्वती देण्यात आलेली नाही. जाहीर करण्यात आलेला भत्ताही तुटपुंज्या स्वरुपाचा आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने असे कर्मचारी कायमस्वरुपी उपलब्ध होण्यात समस्या निर्माण होणार असून दैनंदिन शैक्षणिक प्रशासनावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
शासनाच्या या नव्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने राज्यव्यापी शाळा बंदची हाक दिली होती. सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाने यात सहभागी होऊन पाठिंबा दिला. या आंदोलनात शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्यांच्या संघटनांनीही पाठिबा दिला आहे, अशी माहिती देण्यात आली.
निवेदन देताना संस्थाध्यक्ष जी. एम. सामंत, सचिव योगेश राऊळ, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव गुरुदास कुसगावकर, प्रदीप शिंदे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, मराठा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष दिनेश म्हाडगुत, अध्यापक संघ अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, शिक्षक परिषद सचिव सलीन तकीलदार, पांडुरंग काळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + sixteen =