बांदा :
“विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करून आपल्यातील अंगभूत क्षमतांना वाट मोकळी करून देत स्वतःला जगाच्या पातळीवर सिद्ध करा. येणाऱ्या संधीचे सोने करता आले पाहिजेत ,विद्यार्थी दशेत पैशांच्या मागे न लागता सचोटीवर उतरणारे ज्ञान संपादन केले पाहिजेत. येणाऱ्या कालखंडाची कोणती दालने तुम्हाला खुणावत आहेत याची नेमकी जाण विद्यार्थी म्हणून असायला हवी. अफाट माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या तरुणांना येणाऱ्या कालखंडात खूप संधी निर्माण होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात सृजनशील व नाविन्यपूर्ण मांडणी करणाऱ्या व्यक्तींची गरज भासणार आहे .काळाची पाऊले ओळखून सक्षम ज्ञानलालसेने शिक्षणात अभिरुची घेत जा, ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वांची समाजाला गरज आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष सावंत यांनी येथे केले.
येथील गोगटे — वाळके महाविद्यालय बांदाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुभाष सावंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे चेअरमन श्री डी .बी .वारंग हे होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव एस. आर .सावंत , खजिनदार श्री.टी. एन.शेटकर,संचालक समीर कोलते , डेगवे सरपंच राजन देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन डी कार्वेकर, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. एस. बी .शिरोडकर प्रा. रश्मी काजरेकर आदीजन उपस्थित होते.
या शैक्षणिक वर्षात सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व महाविद्यालयाचे नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी विविध परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या , क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या , सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले .तर वर्षभराच्या विविध उपक्रमांचा सांस्कृतिक लेखाजोखा अहवालाच्या माध्यमातून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन डी कार्वेकर यांनी अहवाल वाचनाच्या माध्यमातून मांडला. या यावेळी विविध दानशूर दात्यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मरणात ठेवलेली स्मृतिपारितोषिके संबंधित यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. या स्मृती पारितोषिकांचे वाचन प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले तर शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिकांचे वाचन डॉ.एस .बी.शिरोडकर यांनी केले
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री डी. बी. वारंग म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी सक्षम पद्धतीने ज्ञानाची कवाडे उघडावीत महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. बी.बी. गायतोंडे यांच्या संकल्पनेतून हे महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगती करीत आहे याचा मनस्वी आनंद आहे. अनेक शैक्षणिक दालनाच्या माध्यमातून हे महाविद्यालय या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडी– अडचणी समजून घेणारे महाविद्यालय म्हणून उल्लेख होत आहे याचा आनंद आहे. विविध क्षेत्रात या महाविद्यालयाचे आजी– माजी विद्यार्थी योगदान देत आहेत व सामाजिक उन्नतीत भर घालत आहेत. या निमित्ताने महाविद्यालयाची यशाची कमान उंचावत आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक करून त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या .यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य सुभाष सावंत यांच्या हस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सन्मान शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी एल.एल.बी. पदवी संपादन केल्याबद्दल डाॅ. एस .पी .वेल्हाळ (राज्यशास्त्र विभाग) , एन.पी.टी.एल परीक्षेत देशात प्रथम आल्याबद्दल डॉ ए.पी. महाले (अकाउंट विभाग) , पीएच.डी पदवी संपादन केल्याबद्दल डॉ.एस. बी .शिरोडकर ( हिंदी विभाग) व इंग्रजी विषयात ‘ सेट ‘ उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. निरंजन आरोंदेकर (इंग्रजी विभाग) तसेच करिअर कट्टा या विभागाचे सावंतवाडी तालुका उत्कृष्ट समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. रमाकांत गावडे या प्राध्यापकांचा उचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव अष्टपैलू खेळाडू , सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कलावंत म्हणून गार्गी विर्नोडकर (तृतीय वर्ष वाणिज्य) उत्कृष्ट लेखक — सायली कदम (तृतीय वर्ष कला) उत्कृष्ट वक्ता म्हणून विठ्ठल दळवी (एम.काॅम.– १) उत्कृष्ट वाचक म्हणून यतीन फाटक (द्वितीय वर्ष कला), अष्टपैलू खेळाडू – हर्ष वासुदेव कांबळी (द्वितीय वर्ष कला), अष्टपैलू खेळाडू ( मुलींमधून) नेहा गवस ( प्रथम वर्ष वाणिज्य), एन.सी.सी बेस्ट कॅडेट गणेश गवस (तृतीय वर्ष वाणिज्य) , सीमा नाईक ( द्वितीय वर्ष कला) एन.एस.एस सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक – नारायण सावंत ( प्रथम वर्ष वाणिज्य), सर्वोत्कृष्ट ळस्वयंसेविका म्हणून राणी कांबळे (प्रथम वर्ष कला) जनरल चॅम्पियनशिप , सांस्कृतिक व क्रीडा , सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील जनरल चॅम्पियनशिप आदि पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमाकांत गावडे यांनी केले तर आभार प्रा. अनिल शिर्के यांनी व्यक्त केले.