You are currently viewing सारेच झपाटलेले…

सारेच झपाटलेले…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*सारेच झपाटलेले…*

 

मंडळी, आमच्या वाड्यात ज्या घरात मोराण्याच्या कमलताई भाड्याने

रहात होत्या व बालवाडीचे काम करत होत्या तेव्हा त्यांचा

मुलगा शाम अवघ्या सहा/सात महिन्यांचा नुकताच बसायला

लागला होता व सहा महिन्याच्या पोराला घेऊन त्या एकट्या

आमच्या आश्रयाने बालवाडीचे काम करत होत्या.(नाही तर आम्ही बघा!)तेव्हा ही राष्ट्रसेवादलाची(नाव ही राष्ट्र सेवा दल

वाह वा!) ही सारीच माणसे देशसेवेने झपाटलेली होती व त्यांनी नाना प्रकारे आपल्याला कामात झोकून दिले होते.कमल ताईंचे यजमान दशरथ तात्या अधून मधून कापडण्याला ताईंना व अप्पांना

म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला येत असत. मोठ्या उमद्या

मनाचे व मोकळ्या स्वभावाचे गृहस्थ होते ते! मला वाटते त्यांनीही राष्ट्रसेवादलाला वाहून घेतले होते.म्हणजे पहा देशातल्या प्रत्येकच माणसाच्या मनात देशासाठी काही ना काही करण्याची प्रबळ इच्छा होती,देश स्वतंत्र होण्याच्या कामी माझी काय व कोणत्या प्रकारे मदत होऊ शकते याचा

प्रत्येक भारतीय मनातून विचार करत होता व जमेल त्या मार्गाने

देशसेवेत सामिल होत होता.(आज कमल ताई व तात्याही नाहीत पण माझ्या नजरेत मी लहानपणी पाहिलेले आज ही

तसेच्या तसे आहेत.)कारण ह्या सर्व मंडळींचे झपाटलेपण

माझ्या बालमनावर कायमचे ठसले आहे. हे फक्त एक उदा.

मी तुम्हाला दिले पण त्यावेळी हे झपाटलेपण प्रत्येकच देशभक्तांत होते असे मी पाहिलेले आहे.क्रांतीपासून ते देश

स्वतंत्र झाल्यानंतरही ही देश प्रेमाची लाट कित्येक वर्षे टिकून

होती व विष्णुभाऊंसारखे कार्यकर्ते कित्येक वर्षे नव्हे आयुष्याच्या अखेरी पर्यंत देशासाठी प्राण पणाला लावून काम

करत होते नि माझ्या वयाच्या पिढीवर हेच चांगले संस्कार होत

होते.(आज हे देशप्रेम लयाला जाऊन त्याची जागा स्वार्थ व

देशद्रोहाने घेतली की काय? असे म्हणण्या इतपत परिस्थिती

भयावह झाली आहे की काय या विचारानेही आमच्या सारख्यांना प्रचंड भीती वाटून एवढ्या कष्टाने मिळवलेल्या व

त्यागाने भारलेल्या स्वातंत्र्याच्या गळ्याला नख तर लागणार

नाही ना? या विचारानेही अस्वस्थ व्हायला होते.)

 

बेचाळीसच्या चळवळीच्या आधी पासूनच ३०/३५ साला पासून

ही सर्व देशभक्त मंडळी देशासाठी अक्षरश: झपाटून तहानभूक

विसरून काम करत होती.माझे वडिल व त्यांचे सहकारी तर

घरदार वाऱ्यावर सोडून देशासाठी काम करत होते.बाळूभाई मेहतां सारखी मंडळी पाठीशी होती व त्यांचा माझ्या वडिलांवर

प्रचंड विश्वास होता. त्या मुळे भूमिगत राहून विष्णुभाऊ रात्री

बेरात्री पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी सायकलवरून

कित्येक मैलांची पायपिट करत कार्यकर्त्यांशी संपर्क साधूनच

त्यांना कामे नेमून देत व पैसाही पाठवत असत. समाजातील

दानशूर मंडळी गुपचूप ह्या क्रांतिकार्याला पैसे पाठवत असत.

कारण इतक्या लोकांचे जेवणखाणं व दारूगोळा पिस्तुले

या साठी ही पैसा लागत असे. तो वरच्या नेत्यांकडून किंवा

समाजातूनच येत असे.ब्रिटिश सरकारला सहकार्य न करता

त्यांच्या पुढे अडचणी निर्माण करून त्रास देऊन त्यांना जेरीस

आणायचे की जेणे करून ते देश सोडतील.पण ते काही कच्या

गुरूचे चेले नव्हते. अतिशय धूर्त,पोहोचलेले व संयमी लोक

होते ते! ते एवढ्या सहजा सहजी थोडीच जाणार होते!

 

खादी भांडाराचे ही काम चालू होतेच. त्या साठी विष्णुभाऊंना

महाराष्ट्रभर फिरावे लागे. सुतकताईचे धडे देऊन विद्यार्थी तयार करावे लागत. त्या मुळे चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठे ही बदली

होई व मुलांना आजोळी ठेवून माझ्या आईला सोबत घेऊन भाऊंची

भ्रमंती चालू असे. आई सुद्धा खादीच्याच साड्या नेसून प्रेमाताई

कंटकांसारख्या महिला नेत्यांसोबत जमेल तसा क्रांतिकार्यात

भाग घेत असे.वर्ध्याला दोन वर्षे गांधी आश्रमात रोज प्रार्थनेला

हजेरी व हरिजन वस्तीत राहून हरिजन बांधवांची सेवा, त्यांच्या

समवेत जेवणखाण करून अस्पृश्यता निर्मुलनाचेही काम वेगात चालू होते.संडास धुण्यापासून सारी कामे आईवडील

करत असत. देशा साठी काहीही.. अशी त्यांची भावना असे.

खानदेशातील विरदेल दलवाडे चिलाणे नवलनगर मुक्टी कापडणे अशा पंचक्रोशितील अनेक गावांत भाऊंनी सुतकताई

व चरख्याचे, पेळू कसे तयार करायचे इथ पासून धडे देत

शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते तयार केले.मग त्यांची ठिकठिकाणी सुतकताई केंद्रावर नेमणूक होत असे व ते

स्वतंत्रपणे ते केंद्र चालवत व त्याचा अहवाल सादर करत असत.स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही धुळे व कापडणे सहित

भाऊंचे हे खादी भांडाराचे काम चालूच होते. कापडण्याला तर

महिला मोठ्या प्रमाणावर हे कताईचे काम करत असत. नंतर

भांऊंनी अंबर चरखे ही मागवले होते.केंद्रात स्वतंत्रपणे माणूस

नेमलेला असे तो हे काम बघत असे.मी खूप वेळा चिल्लर

मोजायला अप्पांबरोबर बोरसे गल्लीच्या शेवटच्या घरात

जात असे व रूपयाच्या नाण्यांच्या गड्ड्या करून अप्पांना देत असे, मग ते रूपये मोजून हिशोब लिहीत असत.

 

३० रूपये पगाराचे मिळत त्यातील १५ रूपये घरी पाठवून भाऊ

१५ रूपयांत कार्यकर्त्यांसह संसार चालवित असत. त्यातून बदल्या व संसार जोडीला होताच.तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आमचे पूर्ण कुटुंबच क्रांतिकार्यात सामिल होते.माझे आजोबा काका व मुक्टीची आत्या व मामा सारेच तुरूंगात

जाऊन आले होते.याला म्हणतात देशभक्ती! कापडणे गावच

मुळी स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते एवढे देशभक्त कापडण्यात होते. कापडण्याचे लोक क्रांतिकारकांची

माहिती देत नाहीत, त्यांना छुपी मदत करतात म्हणून चिडून

ब्रिटिश सरकारने कापडणे गावालाच सामुहिक दंड ठोठावल्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत.अशी कापडणे गावाची

महती आहे. कापडणे गावातील शेकडो लोकांनी या ना त्या प्रकारे ब्रिटिशांना जेरीस आणले होतेच पण फैजपूर कॅांग्रेसचे

अधिवेशन भरले तेव्हा कापडण्यातील महिलांनी रातोरात ३/४ क्विंटल गहू जात्यावर दळून अधिवेशनासाठी पिठाचा पुरवठा केला होता व एकप्रकारे क्रांतिकार्याला हातभारच लावला होता.असे आहे कापडणे गाव! का बरे अभिमान वाटणार नाही त्याचा?

 

भूमिगत असतांना विष्णुभाऊ व त्यांचे सैनिक आताच्या नाशिकच्या थत्तेवाडीत लपून छपून कार्य करत होते.पोलिसांना

सुगावा लागताच रातोरात पळायचे व दुसरे गाव गाठायचे असा

खो खो सतत चालू असे.देशभर पळापळ चालत असे.माझी आई उत्तरप्रदेशची भाषा फार छान बोलत असे.म्हणायची कसला संसार बाई? कागदावर जेवायचो, रात्रीतून कधी कधी

तीन घरे बदलावी लागत असत. पोलिस मागावरच असत कारण त्यांचे खबरे पेरलेले असत ते त्यांना सतत माहिती पुरवायचे.थत्तेवाडीतून मग माझ्या मामाच्या गावाला हिरापूरला

मामाच्या शेतात ही मंडळी बरेच दिवस भूमीगत होती. मामा चोरून लपत छपत त्यांना भाकऱ्या पोहोचवत असत.माझ्या आईची आत्या गंगू आत्या मुलांचा सांभाळ करत असे, एकप्रकारे त्याही घरात बसून क्रांतिकार्यालाच मदत करत

नव्हत्या का? नक्कीच करत होत्या.हे क्रांतिकारक सतत ब्रिटिशांना जेरीस आणत असत. टेलिफोनच्या तारा तोडणे,

जेणे करून ब्रिटिशांची दळणवळण यंत्रणा बंद पडेल, सरकारी

कार्यालये लुटणे, जाळणे, तलाठी ॲाफिस जाळणे, ठिकठिकाणी आगी लावणे जेणे करून सरकारी कागदपत्रे

जळून खाक होतील अशी अत्यंत जोखमीची कामे हे देशभक्त

जीवावर उदार होऊन करत असत.त्यात ते ही जखमी होत असत, पण सापडून जाऊ म्हणून दवाखान्यात जायची सोय नसे असे मोठे जिकिरीचे जीवन या देशभक्तांनी देशासाठी पत्करले होते हे पाहून आज ही अभिमानाने ऊर भरून येतो.आज वाटते लक्षावधी लोकांनी एवढ्या कष्टाने देश स्वतंत्र केला आहे तो जपून ठेऊन तो प्रगती पथावर नेण्यासाठी

कष्टाची व देशभक्तिची आस आम्हाला का नसावी? की आयते मिळालेल्या या स्वातंत्र्याची आम्हाला किंमतच नाही?

जणू काही हा देश आमचा नाही असेच अत्यंत अशोभनिय

असेच आमचे वर्तन असते.

 

 

आपला देश सुंदर व संपन्न व्हावा म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो?झाडे लावतो? पाणी जपून वापरतो? पेट्रोल कमी वापरतो? ध्वनी प्रदूषण कमी व्हावे या साठी प्रयत्न करतो?या

सर्व प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारार्थी आहेत ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे?ही माती हा देश आम्हाला आमचा वाटत

नाही काय? मग देशाकडून काही मागण्याचा तरी आम्हाला काय अधिकार आहे? तर मंडळी देश सेवा अशा प्रकारेही करता येते, सध्या आपण अशा प्रकारे ही देशसेवा करू शकतो.आपल्या देशाला साधन संपत्तीची गरज आहे, ती कशी

वाढवता येईल हे आपण बघू या..

 

बरंय् मंडळी.. धन्यवाद..

जय हिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६९५६४२)

दि: ८ डिसेंबर २०२३

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =