महसूल विभागाचे दुर्लक्ष..
मालवण :
मालवण हडी तलाठी कार्यालयासाठी असणारा तलाठी गेले कित्येक महिने येथून गायब असून या तलाठी कार्यालयाला तलाठी उपलब्ध नसल्यामुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहे. याबाबत हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी वारंवार महसूल विभागाचे लक्ष वेधले असून काही दिवसापूर्वी मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झाल्टे यांना याबाबत लेखी निवेदन सुद्धा दिले आहे.
मालवण तालुक्यातील हडी गावासाठी असणारा तलाठी गेले कित्येक महिने नसल्याने महसूल विभागाची कामे या भागात होत नाही आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांना सातबारा मिळणे, फेरफार मिळणे, तसेच वारस रजिस्टर नोंद, वारस तपास नोंद मंजूर करणे अशी अनेक कामे प्राधान्याने गेले कित्येक महिने रखडलेली आहेत.मालवण याबाबत येथील ग्रामस्थांनी तसेच हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी वारंवार सर्व संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. तरीसुद्धा या भागासाठी आज तलाठी देतो उद्या तलाठी देतो या आश्वासना व्यतिरिक्त अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कृती महसूल विभागाने केलेली नाही. या ठिकाणी तलाठी उपलब्ध नाही ही शोकांतिका आहे.कित्येक ग्रामस्थ हे आपल्या कामासाठी दूरवरून या कार्यालयात आले असता हे कार्यालय बंद पाहून त्यांना त्रासाचे ठरत आहे.