You are currently viewing पाकिस्तानला हरवून तब्बल सहा वर्षानंतर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

पाकिस्तानला हरवून तब्बल सहा वर्षानंतर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

*११ फेब्रुवारीला भारतासोबत विजेतेपदाचा सामना*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

१९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे. भारतीय संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. बेनोनी येथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी भारताने २०१२ आणि २०१८ मध्ये पराभव केला होता. भारताच्या खात्यात एकूण पाच जेतेपदे जमा आहेत.

या सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४८.५ षटकांत पाकिस्तानचा डाव १७९ धावांत गुंडाळला. पाकिस्तानकडून अझान आवेश आणि अराफत मिन्हास यांनी प्रत्येकी ५२ धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ सलामीवीर शामियाल हुसेनला दुहेरी आकडा गाठता आला. तो १७ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्टारकरने २४ धावांमध्ये ६ विकेट घेतल्या. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य किंवा अंतिम फेरीतील हे आतापर्यंतचे सर्वोत्तम आकडे आहेत. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९.१ षटकात ९ विकेट गमावत १८१ धावा करत सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर हॅरी डिक्सनने सर्वाधिक ५० धावा केल्या. ऑलिव्हर पीके ४९ धावा करून बाद झाला. या दोघांशिवाय टॉम कॅम्पबेलने २५ धावा केल्या. अली राजाने २० षटकात ३४ धावा देत सर्वाधिक ४ बळी घेतले. अराफत मिन्हासला दोन बळी मिळाले. नावेद अहमद खान आणि उबेद शाह यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स एका वेळी १५५ धावांवर पडल्या होत्या. ऑलिव्हर पीके बाद झाल्यानंतर कांगारू संघ हा सामना हरणार असे वाटत होते. येथून खालच्या फळीतील फलंदाजांनी धैर्य दाखवले. त्यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा जोरदार सामना केला. टॉम स्टारकरने राफे मॅकमिलनच्या साथीने धावसंख्या १६४ धावांवर नेली. स्टारकर तीन धावा करून बाद झाला. त्याला अली रझाने यष्टिरक्षक साद बेगच्या हाती झेलबाद केले. अली रझाने ४६व्या षटकातच महिल बियर्डमनला शून्यावर त्रिफळाचीत केले. मॅकमिलन आणि कॅलम विडलर यांनी १७ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. मॅकमिलन २९ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला आणि विडलर ९ चेंडूत २ धावा करून नाबाद राहिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा