You are currently viewing राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. विविध देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी अवलंब करून उत्पन्नात घेतलेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी इत्यादी व्दारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता सन 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचे आयोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया न्युझीलंड, नेदरलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरु, ब्राझिल, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर इत्यादी संभाव्य देशाची निवड करण्यात आली आहे.

या दौऱ्यासाठी  शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत.

अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. तसेच चालू कालावधीसाठी त्याचे नांवे 7/12 व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांचे मुख्य उत्पादनाचे साधन शेती असावे व त्यास त्याबाबत स्वयंघोषणा पत्र द्‌यावे लागेल.  शेतकरी कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.  शेतकरी हा किमान बारावी पास असावा व त्यास बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र व आधार प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचे वय 25 वर्ष पूर्ण असावे व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच त्यांच्याकडे वैध पारपत्र (पासपोर्ट) असावा.  शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैदयकिय, वकील, सिए, अभियंता कंत्राटदार इत्यादी क्षेत्रातील नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौऱ्याचा लाभ घेतलेला नसावा.  जर शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली तर त्यास शारीरिकदृष्ट्या तंदुरस्त असल्याबाबत किमान एमबीबीएस डॉक्टरचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

या दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 1 लाख अनुदान देय राहिल. योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याची 100 टक्के रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करावी लागेल. तसेच देय असलेले 50 टक्के अनुदान दौरा पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर डीबिटीव्दारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. प्रवास दौऱ्यामध्ये समाविष्ठ केलेल्याबाबी व्यतीरिक्त इतर बाबी वरील खर्च शेतकऱ्यास स्वतः करावा लागेल.

देशाबाहेर अभ्यास दौऱ्याकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यास 3 शेतकरी लक्षांक प्राप्त झाला असून लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय समिती समोर सोडत पध्दतीने ज्येष्ठता क्रम निश्चित करुन शेतकरी निवड करण्यात येईल.

या दौऱ्यासाठी निवड प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने दि. 9 फेब्रुवारी 2024 अंतिम तारीख दिल्याने ईच्छुक लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दि. 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रत्यक्ष सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा