सावंतवाडीत १० ते १४ फेब्रुवारी काळात ५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन – दीपक केसरकर
मुख्यमंत्री ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार
सावंतवाडी
शासनाच्या माध्यमातून सावंतवाडीत १० ते १४ फेब्रुवारी या काळात ५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन होत आहे. यात तब्बल ८०० हून अधिक शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील जिमखाना मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. या तब्बल ५०० हून अधिक स्टॉल आहेत. समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर त्या ठिकाणी सादरीकरण केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहे. आपण मात्र या प्रदर्शनाला जातीनिशी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रदीप- कुमार कुडाळकर, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, कल्पना बोडके, राजन पोकळे, नितीन सांडये, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.
दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने घेतली आहे. सावंतवाडी येथे होणाऱ्या या बालवैज्ञानिक प्रदर्शनास राज्यभरातील मंडळी येणार आहेत. सावंतवाडीकरांनी त्यांचा पाहुणचार करावा, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली देशातील प्राथमिक-माध्यमिक च्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि विज्ञान आणि गणितातील नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते.
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन हा या उपक्रमांचा एक भाग आहे. ज्यामध्ये देशभरातील सर्व राज्यांमधून राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधील निवडक विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. राज्यस्तरीय प्रदर्शनाची सुरुवात तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात. हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी प्रदर्शन कालावधीत खुले राहणार आहे.