You are currently viewing उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा थाटामाटात पार पडला. या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खानोली गावचे सुपुत्र आणि निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आपल्या वैचारिक मंथनातून वास्तववादी विवेचन केलं तर ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद अशा महापुरुषांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना समोर मांडले.

आदर्श विद्यार्थीनी म्हणून श्रुती श्रीधर शेवडे आणि आदर्श विद्यार्थी म्हणून दिपेश जयराम वराडकर या दहावीच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शाळेचा माजी विद्यार्थी आणि तरूण कलावंत प्रथमेश पार्सेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी विद्यार्थी वर्गाकडून सांस्कृतिक कला क्षेत्रात योगदान देणा-या विद्यार्थ्यांला स्व. प्रथमेश पार्सेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा मानाचा पुरस्कार विर नारायण गावडे याला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी उत्कृष्ट क्रीडावीर कु. शौर्य तारी तर क्रीडाबाला सन्मान कु.योजना कुर्ले हिला निलेश मांजरेकर आणि राधाकृष्ण मांजरेकर यांनी प्रदान केला. आदर्श शिक्षक पुरस्कारचे मानकरी दीपक बोडेकर ठरले. त्यांना रमेश पिंगुळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

शैक्षणिक वर्षात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळणारे गुणवंत विद्यार्थी तसेच बाह्य स्पर्धेत वक्तृत्व, निंबध, रांगोळी, मॅरेथॉन, दशावतार, कथाकथक, काव्य लेखन अभिनय, लंगार नृत्य, समुहगान, समुहनृत्य आणि विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत बाजी मारत आपल्या शाळेच्या नावलौकिकात भर घालणा-या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांनी, अहवाल वाचन वर्षा मोहिते यांनी सादर केला. विशेष निधी ठेव बक्षिस समारंभाचे निवेदन भिसे यांनी केले तर क्रीडा क्षेत्रातील बक्षिस समारंभासाठी अंधारी यांनी निवेदन केले. या कार्यक्रमाचे नियोजन कुबल यांनी केले.

यावेळी निवृत्त अध्यापिका उल्का वाळवेकर, श्रीधर शेवडे, भाभी पडवळ आदी पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले. शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी दिलीप गोठसकर यांचेही सहकार्य लाभले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा