*संदीप महाजन राजकारणात लवकरच सक्रिय*
पाचोरा (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र पत्रकारिता क्षेत्रातील बहुचर्चित पत्रकार संदीप महाजन लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांनी नुकताच व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या पत्रकार हल्ला विरोधी विंगच्यअ राज्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाची शक्यता वाढली आहे.
संदीप महाजन हे पाचोरा शिवसेनेच्या प्रारंभापासून सक्रिय सहभाग असलेले आणि सन २००० पासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे पत्रकार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या आमदार पदाच्या विजयाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश न करता दिलीपभाऊंचे स्टार प्रचारक म्हणून काम केले होते.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये पाचोरा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ते आमदारांकडून झालेली शिवीगाळ आणि तदनंतर मारहाण प्रकरणी बहुचर्चेत आले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक पत्रकार संघटना आणि पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रीया देतांना महाजन म्हणाले, “माझ्यावर जो प्रसंग आला होता, त्यावेळी त्या घटनेचा निषेध करत, मला महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक प्रसारमाध्यमे, पत्रकार आणि पत्रकारांच्या विविध संघटना माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आजही आहेत. त्यांचा मी सदैव ऋणी आहे आणि कायम राहीन. परंतु मी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेत असतांना मला व्हाईस ऑफ मिडीयाच्या पत्रकार हल्ला विरोधी विंगच्या राज्यध्यक्ष पदाला न्याय देणे शक्य नाही किंवा माझ्या राजकीय चळवळीत मी पत्रकार संघटनेचा वापरही करू नये हा उद्देश ठेऊन राजीनामा दिला आहे. माझे हे मात्र निश्चित झाले आहे की मला राजकारणात पुनश्च सक्रिय होणे आहे. मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे आज सांगू शकत नाही किंवा मला कोणतीही निवडणूक लढवायची देखील नाही तसेच कोणत्याही राजकीय पदासाठी मी इच्छुकही नाही. परंतु लक्ष एकच असेल. पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूकीत विजयी कोण होणार त्यात माझा किती वाटा असणार असणार त्यापेक्षा कोणाच्या तरी पराभवात माझा नक्कीच सिंहाचा वाटा असेल.”
महाजन यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना गती आली आहे. विधानसभेची पुढील निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. या निवडणूकीत महाजन कोणत्या पक्षाला सहकार्य करतात आणि ते किंवा त्यांच्या गतिविधि किती यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.