You are currently viewing कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिकांना होणार – सुहास सावंत

कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिकांना होणार – सुहास सावंत

कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिकांना होणार – सुहास सावंत

दाखले मिळण्यास अडचणी असणार्‍यांना महासंघ सहकार्य करणार

सावंतवाडी

कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिक मराठा बांधवांना होणार आहे, असा दावा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. सुहास सावंत यांनी केला. ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांना तो कसा देता येईल, दाखले कसे मिळतील यासाठी आम्ही समाज बांधव म्हणून पुढाकार घेणार आहोत, असे ही ते म्हणाले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडुन आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या सर्व्हेत ढिलाई आहे, असा आरोप त्यांनी केला तसेच जिल्ह्यातील समाज बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी योग्य पध्दतीने सर्व्हेक्षण केले जावे, असे ही त्यांनी सांगितले. मराठे युध्दात जिंकले, मात्र तहात हरले, अशी टिका काही लोकांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री. सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी विकास सावंत, पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. सावंत यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही तहात हरलो, असे कोण म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्याला सुध्दा झाला आहे. सद्यस्थितीत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात १४०० नोंदी सापडल्या आहेत. त्याचा फायदा २० हजारहून अधिक बांधवाना होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगे सोयरे या शब्दाचा आधार घेवून ज्यांना दाखले मिळण्यास अडचणी येणार त्यांना दाखले मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
ते पुढे म्हणाले, या ठिकाणी आम्ही महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी अभिषेक सावंत यांना नियुक्ती दिली आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते श्री. सावंत यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष आशिष काष्टे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मनोहर येरम, संजय लाड, अब्जू सावंत, विशाल सावंत, प्रशांत ठाकूर, नंदादीप विचारे, शिवदत्त घोगळे, सतीश सावंत, सुनील सावंत, अभिजीत सावंत, प्रसाद राऊळ, सूर्यकांत राऊळ, मुकेश जाधव, संदीप गवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा