You are currently viewing प्रसाद कुलकर्णी यांना ‘दीनबंधू भाई दिनकरराव यादव जीवनगौरव पुरस्कार ‘जाहीर

प्रसाद कुलकर्णी यांना ‘दीनबंधू भाई दिनकरराव यादव जीवनगौरव पुरस्कार ‘जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांना दीनबंधू भाई दिनकरराव यादव जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शब्दगंध साहित्य परिषद (शिरोळ )यांच्या वतीने गुरुवार ता. १ फेब्रुवारी २०२४ रोजी दिनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनामध्ये हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. कालवश भाई दिनकरराव यादव हे शिरोळचे माजी आमदार, दीन दलितांचे कैवारी, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष अशा विविध अंगाने ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी रामदास फुटाणे आहेत. तर प्रमुख पाहुणे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराज धुळूबुळू यांची प्रमुख उपस्थिती असेल. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतरावदादा पाटील आहेत.

प्रसाद कुलकर्णी हे समाजवादी प्रबोधिनीचे गेली ३९ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्ता,लेखक, संपादक, कवी, गझलकार वक्ता, मुलाखतकार, वृत्तपत्र पत्रलेखक, ब्लॉगर, यू ट्यूबर, विविध उपक्रमांचा संयोजक अशा विविध अंगाने त्यांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही सर्वदूर परिचय आहे. भाई माधवराव बागल पुरस्कार ते महात्मा गांधी सद्भावना पुरस्कारासह तीसहून अधिक पुरस्कारानी सन्मानित असलेल्या प्रसाद कुलकर्णी यांचा दीनबंधू भाई दिनकरराव यादव जीवन गौरव पुरस्काराच्या रुपाने पुन्हा एकदा सन्मान झाला आहे.

या साहित्य संमेलनात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांसह मान्यवरांची मनोगते, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, काव्य कट्टा, पुस्तक प्रकाशन आदी भरगच्च कार्यक्रम आहेत. तसेच यावेळी पै.अमृता शशिकांत पुजारी (शिरोळ) यांना ‘भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार ‘देऊन गौरवण्यात येणार आहे. हे संमेलन दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ हॉल, श्री दत्त सहकारी साखर कारखाना परिसर, शिरोळ येथे होणार आहे. या साहित्य संमेलनात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार, उपाध्यक्ष डॉ.दगडू माने, सचिव शंतनू यादव आणि सर्व सदस्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा