You are currently viewing महावितरण विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीजग्राहक संघटनेचे शेकडो पदाधिकारी अन्नत्याग करून करणार लाक्षणिक उपोषण

महावितरण विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीजग्राहक संघटनेचे शेकडो पदाधिकारी अन्नत्याग करून करणार लाक्षणिक उपोषण

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे उद्या दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी कुडाळ येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण होत असून विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या राज्य सरकारच्या वीज वितरण महामंडळाची दयनीय अवस्था म्हणजे नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे. महावितरण कडून जिल्ह्यातील वीज ग्राहकांची होणारी पिळवणूक कुठेतरी थांबविणे गरजेचे असून त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून जिल्हा व्यापारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२२ मधील व्यापारी मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची स्थापना झाली आणि संघटनेची मुहूर्तमेढ रोवली ती वीज क्षेत्रातील एक जाणकार नाव म्हणजे खुद्द श्री.प्रतापराव होगडे साहेबांनी. त्यानंतर संघटनेचा जिल्ह्यातील आवाका पाहत जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आल्या असून तालुका पातळीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांना योग्य ते काम करण्यासाठी प्रयत्न केला आहे. संघटना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरुद्ध आवाज उठवत आहे. जिल्ह्यातील वीज समस्या कोल्हापूर, रत्नागिरी येथील विभागीय कार्यालय पासून मुंबई येथील प्रतापगड कार्यालयापर्यंत मांडल्या आहेत. वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत काही समस्यांवर काम देखील सुरू झाले आहे परंतु गेली अनेक वर्षे कामात दिरंगाई करणाऱ्या निर्ढावलेल्या महावितरणला म्हणावी तशी जाग येत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना रस्त्यावर उतरली असून त्याचे पहिले पाऊल म्हणून अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यापेक्षा *वीज ग्राहकांच्या हक्कासाठी* महावितरणच्या मुख्य कार्यालय असलेल्या एमआयडीसी कुडाळ येथे लाक्षणिक उपोषण करत आहे.

जिल्ह्यात वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून गेल्या ६०/७० वर्षांपूर्वी महावितरणने उभे केलेले पोल आज मोडकळीस आलेत, कित्येकदा जुनाट झालेल्या विद्युत तारा तुटून पडतात, अपघात होतात, घरे, उभी शेतं, गुरे ढोरे अगदी माणसे सुद्धा दगावतात. परंतु केवळ दहा वीस हजारांची भिक देऊन माणसाच्या जीवाची किंमत केली जाते ही खरोखरच शोकांतिका म्हणावी लागेल. जिल्ह्यातील वीज ग्राहक आज पोळून निघालेत तरी कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाहीत म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फावले आहे. परंतु वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आपल्या हक्काची वीज सेवा मिळविण्यासाठी जागृत करण्याचे काम संघटना करत असून जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी देखील संघटना प्रयत्नशील आहे. यासाठीच उद्या २६ जानेवारीला कुडाळ येथे संघटना *लाक्षणिक उपोषण* करत असून जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी या उपोषणामध्ये मोठ्या संख्येने सामील होणे आवश्यक आहे.

*मंगळवार दि. २६ जानेवारी २०२४*

*वेळ: सकाळी ९.०० वाजता*

*स्थळ: महावितरण जिल्हा कार्यालय, (एमआयडीसी) कुडाळ.*

*वीज ग्राहकांच्या हक्कासाठी…*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना उद्भवणाऱ्या वीज वितरण बाबतच्या असंख्य समस्यांना जबाबदार असलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जागे करून वीज ग्राहकांचे हक्क मिळविण्यासाठी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे लाक्षणिक उपोषण होत असून महावितरणला दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे

प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, अस्थिर वीजदाब यामध्ये बदल घडविणे.

पावसाळ्यापूर्वी वीज तारांवरील झाडी तोडणे, खांबांवर वाढलेल्या वेली छाटणे.

जुनाट गंजलेले, सडलेले वीज पोल, तारा तात्काळ बदलणे.

जिल्ह्यातील ४०% वीज मीटर बंद अवस्थेत असूनही ग्राहकांकडून होणारी भरमसाट वीज बिल वसुली बंद करणे.

ग्राहक संख्येनुसार जिल्ह्यात आणखी २०/२५ नवीन सबस्टेशन उभारणे.

भूमिगत वीज वाहिन्या जोडणी करणे जेणेकरून वीज वितरणाचे होणारे नुकसान कमी होईल पर्यायाने ग्राहकांना पडणारा भुर्दंड कमी होईल.

इतर विभागीय कार्यालयाप्रमाणे जनसंपर्क अधिकारी (PRO) नियुक्ती करणे.

ग्राहकांना योजनांची माहिती देण्यासाठी ग्राहक मेळावे घेणे, लोकांमध्ये योजनांचा प्रचार, प्रसार करणे.

लोकांच्या घरावरून, शेतातून गेलेल्या वीज तारांचे तातडीने शिफ्टींग करणे. प्रत्येक गावात कायमस्वरूपी वायरमन, लाईनमन नियुक्त करणे.

रिक्त पदांवर अधिकारी नियुक्ती करणे वायरमन परमनंट करण्याची मुदत १० वर्षे वरून ५ वर्षे करणे.

ग्राहकांशी उद्धट वर्तणूक करणाऱ्या, मुजोर, बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करणे इ. मागण्या करण्यात आल्या असून त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हा वीज ग्राहक संघटनेने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रयत्नांना यश यावे आणि महावितरणची वीज वितरण व्यवस्था सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा