You are currently viewing दोन धर्मात तेढ निर्माण करणारी सावंतवाडीतील युवकाची इंस्टाग्राम स्टोरी वादग्रस्त

दोन धर्मात तेढ निर्माण करणारी सावंतवाडीतील युवकाची इंस्टाग्राम स्टोरी वादग्रस्त

*हिंदूधर्मियांची पोलीस स्थानकात धाव; युवकावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी*

 

सावंतवाडी :

सावंतवाडी शहरातील महाविद्यालयीन युवकाने हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी इंस्टाग्राम स्टोरी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर पोष्ट केली व त्याच्या मैत्रिणींनी सदरची स्टोरी शेअर केली, त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू धर्मियांनी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत संबंधित युवकासह स्टोरी शेअर करणाऱ्या सर्वांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु चौकशी सुरू असल्याचे कारण सांगत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने सायंकाळी भाजपाचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका प्रचारक नितीन गावड, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे आदींसह अनेकांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनवर धडक दिली. अखेर सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली.

दरम्यानच्या काळात भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत चर्चा केल्यानंतर श्री.अधिकारी यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

सदरची घटना मंगळवारी दुपारी घडल्यानंतर काही हिंदू धर्मियांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल होत सदर युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्याने रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने हिंदू धर्मियांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. यावेळी सुनील सावंत, किशोर चिटणीस, केतन आजगावकर, गौरव शंकरदास, सुधा राणे, अजय सावंत, अजित सांगेलकर, प्रतीक बांदेकर आदींसह शेकडो नागरिक सामाजिक कार्यकर्ते पोलीस स्थानकात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =