You are currently viewing कणकवली उपविभागात 3 महिन्यांत 199 कुणबी दाखल्यांचे वाटप

कणकवली उपविभागात 3 महिन्यांत 199 कुणबी दाखल्यांचे वाटप

कणकवली उपविभागात 3 महिन्यांत 199 कुणबी दाखल्यांचे वाटप

  • साडेसहा लाख नोंदीची तपासणी

सिंधुदुर्गनगरी

निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील नोंदी शोधण्याची मोहिम सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. या अंतर्गत कणकवली विभागातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यातील 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि कुणबी या जातींच्या  22 हजार 834 एवढ्या नोंदी आढळल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत सुमारे 199 कुणबी दाखल्यांचे वाटप झाल्याचे उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.

            कणकवली उपविभागातील वैभववाडी तालुक्यात 2 लाख 40 हजार 414, देवगड तालुक्यात 49 हजार 296  तर कणकवली तालुक्यात 3 लाख 64 हजार 450 अशा एकूण 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली. या नोंदींच्या तपासणीअंती कुणबी मराठा- 897, मराठा कुणबी-484 तर कुणबी जातीच्या 21 हजार 491 अशा एकुण 22 हजार 834 एवढ्या नोंदी आढळल्या.

            सन 1986 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत कणकवली – 795, देवगड-3065 तर वैभववाडी तालुक्यात 1 हजार 724 अशा एकूण 5 हजार 566 कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले होते. ऑक्टोबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत सुमारे 199 कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले असल्याचेही श्री कातकर यांनी सांगितले.

            शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार तालुक्यात कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुक्यात अशा नोंदी सापडलेल्या  गावांमध्ये या नोंदीची माहिती तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली असून ज्यांना त्या अनुषंगाने जात दाखल्यांची आवश्यकता आहे, त्यांनी प्रकाशित पुराव्यांसह अर्ज करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर  यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा