You are currently viewing देशात आज दिवाळी!

देशात आज दिवाळी!

देशात आज दिवाळी!

अडीच हजार क्विंटल फुलांनी सजली अयोध्या

आता काही तासांत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा

अयोध्या
आज 22 जानेवारी आहे. आज रामलल्लांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. लाखो भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

हा सोहळा सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. श्रीरामांसाठी अयोध्येमध्ये भव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे, या मंदिरात आज रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा विधीला आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्त आणि मृगशिरा नक्षत्राच्या शुभ योगावर करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकूण पाच व्यक्ती मंदिराच्या गर्भगृहात असणार आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं वेळापत्रक

सकाळी 10.25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्या विमानतळावर आगमन होईल.
10 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान अयोध्या हेलिपॅडवर पोहोचतील.
10 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधानांचं श्रीराम जन्मभूमीवर आगमन होईल.
11 ते 12 ही वेळ आरक्षित ठेवण्यात आली आहे.
दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरूवात होईल.
12 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधान पूजा स्थळावरून प्रस्थान करतील.
दुपारी 1 वाजता पंतप्रधानांचं सार्वजनिक कार्यक्रमस्थळी आगमन होईल.
दुपारी 1 ते 2 या वेळेत पंतप्रधान अयोध्येतल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार.
दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान कुबेर टिलाचं दर्शन घेतील.

मंदिराच्या गर्भगृहात पाच वर्षांच्या रामलल्लांची 51 इंचची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. या मूर्तीचा रंग सावळा आहे. यात 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरुपातील श्रीराम कमळावर विराजमान होतील. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची आठ फूट आहे. हिंदू धर्मात बालपण हे साधारणतः पाच वर्षं वयापर्यंत मानलं जातं. त्यानंतर मूल सुबुद्ध मानलं जातं. चाणक्य तसंच अनेक विद्वानांच्या मते, पाच वर्ष वयापर्यंत मुलाची प्रत्येक चूक माफ केली जाते. कारण ते समजूतदार नसतं. या वयापर्यंत केवळ त्याला शिकवण्याचं काम केलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये देव आणि महान व्यक्तींच्या बाललीलांचा आनंद त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जास्त आला आहे, त्यामुळे रामलल्लांची मूर्ती 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरुपात ठेवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा