You are currently viewing भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी

माणगाव प्रतिनिधी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी माणगाव मळावाडी येथे घडली. सुदैवाने या हल्ल्यानंतर स्थानिकांनी धावधाव करून या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून वासराची सुटका केली आणि या वासराचे प्राण वाचवले. मात्र या हल्ल्यामुळे जखमी वासरावर दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करावी लागली.

शनिवारी मळावाडी येथे शेतात चारा खात असलेल्या विनय आडेलकर यांच्या वासरावर या भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुमारे वीस भटक्या कुत्र्यानी या वासराला जमिनीवर पाडत त्याचे चावे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विहार आडेलकर, माया नानचे, सुषमा नानचे, भाऊ नानचे यानी धाव घेत या कुत्र्यांना पिटाळून लावले. मात्र तोपर्यंत या कुत्र्याने या वासराच्या अंगावर अनेक ठिकाणी चावे घेत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर पशुवैद्यकीय श्री भाईप यांनी या वासरावर दहा टाक्यांच्या शस्त्रक्रियेसह जखमावर उपचार केले.

दरम्यान गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून यापूर्वीही या भटक्या कुत्र्यांनी पाळीव जनावरावर हल्ले करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे. पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तु मळावाडी परिसरात टाकत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तु उघड्यावर टाकणाऱ्याना समज द्यावी तसेच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =