You are currently viewing मालवणात २२ जानेवारीला भव्य दीपोत्सव; निलेश राणेंची उपस्थिती

मालवणात २२ जानेवारीला भव्य दीपोत्सव; निलेश राणेंची उपस्थिती

मालवणात २२ जानेवारीला भव्य दीपोत्सव; निलेश राणेंची उपस्थिती

आकर्षक रोषणाईसह २०० कंदील आकाशात सोडणार

मालवण

राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने मालवणात भाजपच्या वतीने भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. यात बंदर जेटी येथे तीस फुट उंच श्री रामाची प्रतिमा उभारण्यात येणार आहे. तर रात्री दिव्यांच्या रोषणाईसह दोनशे आकाशकंदील आकाशात सोडण्यात येणार आहेत.

पौष शुल्क द्वादशी विक्रम संवत २०८० सोमवार २२ जानेवारी या शुभ दिनी अयोध्या येथे श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मिती श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यावेळी अयोध्येत अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे. येथील नागरिकांनीही आपल्या परिसरातील मंदिरामध्ये सकाळी ११ ते १.३० या काळात रामभक्तांना एकत्र करून १०८ वेळा जप करावा. सायंकाळी सात वाजता आपल्या घरासमोर पाच पणत्या लावून दीपप्रज्वलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

याच सोहळ्याचे औचित्य साधून मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर जेटी येथे तीस फूट उंच असणारी भव्य राम प्रतिमा उभी करण्यात येणार आहे . त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता निलेश राणे व शहरातील देवस्थान विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये २५००० इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक रोषणाई टप्प्याटप्प्याने प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता दोनशे आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात येणार आहेत. भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मालवणवासीयांनी मोठ्या संख्येने बंदर जेटी येथे उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा